साईनगरी शिर्डीमध्ये उतरले पहिले विमान! मुंबईहून ३५ मिनिटांत पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 02:16 IST2017-09-27T02:15:41+5:302017-09-27T02:16:02+5:30
जगभरातून येणा-या साईभक्तांना आता शिर्डीला विमानाने जाता येणार आहे. शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिले विमान यशस्वीपणे उतरले.

साईनगरी शिर्डीमध्ये उतरले पहिले विमान! मुंबईहून ३५ मिनिटांत पोहोचणार
शिर्डी : जगभरातून येणा-या साईभक्तांना आता शिर्डीला विमानाने जाता येणार आहे. शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिले विमान यशस्वीपणे उतरले. आता १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण होईल. २ आॅक्टोबरला नियमित विमानसेवा सुरू होईल.
मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुपारी सव्वाचार वाजता शिर्डीच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे ७२ आसनी विमान केवळ ३५ मिनिटात शिर्डी विमानतळावर पोहचले. साईनगरीच्या विमानाचा पहिला प्रवासी होण्याचा मान अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर गुप्ता, विभागीय संचालक मुकेश भाटिया यांच्यासह चौदा जणांचा समावेश होता. राकेश शेट्टी व संदीप मेहरा या विमानाचे वैमानिक होते. संध्याकाळी हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले़ विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह स्थानिक नेते स्वागतासाठी उपस्थित होते.
ट्रायल लँडिंगचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, हा मोठा योग आहे़ सुरूवातीला मुंबईहून चार, दिल्लीहून व हैदराबाद येथून प्रत्येकी एक अशा सहा विमानांच्या फेºया सुरू होतील़ धावपट्टीच्या विस्तारानंतर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल.
- राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर