‘साई रहम नजर करना...मुझको चरण दिखलाना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:49+5:302021-06-21T04:15:49+5:30
शिर्डी : साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीत शांत आहे. साईमंदिराची कवाड खुली व्हावी म्हणून प्रत्येकजण बाबांना साकडे घालत आहे. ...

‘साई रहम नजर करना...मुझको चरण दिखलाना’
शिर्डी : साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीत शांत आहे. साईमंदिराची कवाड खुली व्हावी म्हणून प्रत्येकजण बाबांना साकडे घालत आहे.
रोज बाबांच्या आरतीतील दासगणू रचित ‘साई रहम नजर करना.......मुझको चरण दिखलाना’ हे पद गाताना, ऐकताना प्रत्येक भाविकाचा कंठ दाटून येत आहे. शिर्डी अनलॉक असली तरी शिर्डीसह जवळपासच्या हजारो कुटुंबांचा रोजगार, बाजारपेठ साईमंदिर व भाविकांवर अवलंबून आहे. मधल्या काही महिन्यांचा अपवाद वगळता कोविडमुळे जवळपास सव्वा वर्ष साईमंदिर बंदमुळे शिर्डीचा श्वासच थांबला आहे.
शहरात जवळपास लहान-मोठी आठशेहून अधिक हॉटेल्स, लॉजेस, दोनशेच्या आसपास रेस्टॉरंट, दोनशेवर फुल, प्रसादाची दुकाने, हजारावर प्रवासी वाहने, मूर्ती, फोटो, लॉकेटची हात विक्री करणारे शेकडो मूल, फूल उत्पादक सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या व्यावसायिकांचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे, वीजबिले, नगर पंचायतचे करसुद्धा भरणे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कामगारांना केव्हाच सुट्टी देण्यात आली आहे. अनेकजण बांधकामे, शेतीच्या कामांवर मोलमजुरी करत आहेत, रोजीरोटीसाठी आलेल्या अनेकांनी गावाची वाट धरली, तर काही कुटुंबे देशोधडीला लागली. ‘बड घर पोकळ वासा’ या म्हणीनुसार शिर्डीच्या अर्थचक्राचा ‘वासा’ केव्हाच मोडून पडला आहे. साईमंदिर बंदचा फटका आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांनाही बसला आहे.
...............
कोरोनाच संकट अजून टळले नसले तरी प्रशस्त परिसर, मोठा गाभारा, मंदिरातील वायुविजन व्यवस्था, संस्थानकडून घेण्यात येणारी काळजी बघता लहान मुलांना बंदीबरोबरच ऑनलाइन बुकिंग व लसीकरण सक्तीचे करून मंदिर खुले करायला हवे.
- शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष, शिर्डी
.........................
जवळपासच्या तालुक्यांसाठी सवलतीच्या दरात हेरिटेज व्हिलेज खुले केले. जेवढे कामगार आहेत तेवढेही पर्यटक येत नसल्याने या कामगारांचा पगारही सुटत नाही.
- किशोर बोरावके, साई हेरिटेज व्हिलेज
...........................
अनलॉकमुळे दुकाने उघडली पण भक्तांशिवाय त्यात जिवंतपणा नाही, जीव जात नाही म्हणून हात पाय खोडत आहोत. आलेला दिवस ढकलत आहोत.
-रवींद्र गोंदकर, व्यावसायिक
...............
- कळस दर्शनाने मन तृप्त होत नाही,आता साईदर्शनाची आस लागली आहे. -
डॉ. किशोर सोनवणे, फर्ग्युसन कॉलेज, पुणे भाविक.
.............
मंदिर उघडणे शासनाच्या हाती आहे, मानवजातीवरील कोरोनाच आरिष्ट जावो व नागरिक नियमांच पालन करून यासाठी साईबाबांना प्रार्थना.
-दिलीप सुलाखे, मंदिर पुजारी