शुक्रवारी (दि.३) साई प्रवरा शेतकरी सुविधा केंद्राच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. राहुरी तालुक्यातील केसापूर येथे महाएफपीसी अंतर्गत जिल्ह्यातील नऊ शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांचा वर्धापन दिन आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संभाजी नानोर होते. सचिव दादासाहेब मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण करण्याचे काम साई-प्रवरा कंपनी करीत आहे. तूर, मका, सोयाबीन खरेदीला एमएसपीप्रमाणे शासनाने परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शेतमाल विनिमयासाठी थायलंडच्या प्रसिद्ध कंपनीशी करार केला आहे. कापूस व कॉटन जिनिंगसाठी शासनाच्या वतीने मदत मिळणार आहे. नाफेड-महाओनिअन मार्फत गुणवत्तापूर्वक कांदा खरेदीच्या स्पर्धेत साई प्रवरा कंपनी अग्रेसर आहे.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी म्हणाले, देशाच्या अर्थकारणाला हातभार लावण्याचे काम साई प्रवरा शेतकरी कंपन्यांमार्फत होणार आहे.
अहमदनगर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. जी. एम. चिंधे यांनी राज्यातील २५ पैकी ९ प्रकल्प नगर जिल्ह्यात सुरू असून, कांदा चाळ प्रकल्प हे शेतकऱ्याने तयार केलेले मॉडेल आहे. लासलगाव पद्धतीने कांदा खरेदीस सुरुवात करणार आहोत, असे सांगितले.
याप्रसंगी प्रभात उद्योग समूहाचे सारंगधर निर्मळ, मानेग्रोचे संस्थापक अध्यक्ष उमेश माने, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे संभाजी नालकर, सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, उपविभागीय जिल्हा कृषी अधीक्षक विलास नलगे, पुणे विभागाचे महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.