दररोजच्या स्रानाने साई मूर्तीची होणार झीज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 23:39 IST2016-04-09T23:36:17+5:302016-04-09T23:39:59+5:30
प्रमोद आहेर, शिर्डी जगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईसमाधी मंदिरातील संगमरवरी मूर्तीला आठ दिवसांनी स्नान घालावे, टॉवेलने पुसू नये

दररोजच्या स्रानाने साई मूर्तीची होणार झीज !
प्रमोद आहेर, शिर्डी
जगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईसमाधी मंदिरातील संगमरवरी मूर्तीला आठ दिवसांनी स्नान घालावे, टॉवेलने पुसू नये, अन्यथा ही मूर्ती पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होईल, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी देवूनही संस्थानने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही़ साईसमाधीचे शताब्दी वर्ष साजरे करताना या ऐतिहासिक मूर्तीच्या जपवणुकीकडे होणारे दुर्लक्ष साईभक्तांना मानवणारे नाही़
या मूर्तीचे सौंदर्य, भव्यता सुरक्षित ठेवायची असेल तर या मूर्तीला रोज स्नान घालू नये, गरम पाणी अजिबात वापरु नये, यामुळे संगमरवर ठिसूळ होतो, मूर्तीवर दही- दूध टाकू नये, त्यातील आम्लाचा मूर्तीवर परिणाम होतो़ मूर्तीच्या दाढीचे केस, हातापायांची नखे ही झिजलेली आहेत आणि हे असेच चालू राहिले तर नजीकच्या काळात ही मूर्ती पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होईल, असा इशारा या मूर्तीचे शिल्पकार बाळाजी उर्फ भाऊसाहेब तालीम यांचे वंशज हरीश तालीम यांनी १९७९ साली मूर्ती स्थापनेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दिला होता़ या मूर्तीला आठ दिवसांनी स्रान घालावे, टॉवेलने पुसू नये, त्याऐवजी कापडाने पाणी टिपावे, यामुळे ही मूर्ती आणखी काही काळ टिकेल, असा सल्लाही तालीम यांनी दिला होता़ मात्र,दुर्दैवाने साठ वर्षानंतरही संस्थानने याबाबीकडे गंभीरतेने बघितलेले नाही़ २००६ सालापर्यंत या मूर्तीला रोज गरम पाण्याच्या बादल्या व दुधाने स्रान घालण्यात येत असे़ ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधताच संस्थानने यात कपात केली़ आता रोज दोन तांबे पाण्याने स्रान घालून टॉवेलने घासून पुसण्यात येते़
भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा विषय संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीसमोर मांडू.
-कुंदन सोनवणे,
प्रभारी कार्यकारी अधिकारी,
साई संस्थान
७ आॅक्टोबर १९५४ रोजी साई पुण्यतिथीला ही मूर्ती स्थापन करण्यात आली़ इटालियन कराका मार्बलची असलेली ही मूर्ती साडेपाच फूट उंच आहे़ या मूर्तीला तयार करण्यास सात महिन्यांचा कालावधी व बावीस हजार रुपये खर्च आला होता़ ही मूर्ती पिढ्यान्पिढ्या अशीच सुंदर राहावी, असे वाटत असेल तर तिला रोज स्नान घालू नये, ओल्या कापडाने हळूवार पुसावी, स्रानासाठी उत्सव मूर्ती वापरावी, असे संस्थानला अनेकदा सुचवले मात्र उपयोग झाला नाही़
-सदाशिव गोरक्षकर,
माजी संचालक,
प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम, मुंबई,