सारडा महाविद्यालयात स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:43 IST2018-01-28T16:39:48+5:302018-01-29T14:43:27+5:30
समाजाची गरज ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर महाविद्यालयांनी भर द्यावा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर

सारडा महाविद्यालयात स्नेहसंमेलन
अहमदनगर : देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बाहेरील देशातील घडामोडी अवघ्या काही मिनिटांत आपल्याला समजतात. त्यामुळे आता काळ व समाजाची गरज ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर महाविद्यालयांनी भर द्यावा, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केली.
येथील सारडा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सिनेट सदस्य प्रा. अनिल कुलकर्णी होते. या सोहळ्यास हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे अध्यक्ष अनंत फडणीस आदींसह मंडळाचे संचालक, निवृत्त प्राध्यापक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी हा नोकरी शोधणारा न होता, नोकरी देणारा निर्माण व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी गरज पडल्यास अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज आहे. डिजिटल युगामध्ये आपसातील संवाद कमी होत चालला आहे. घरातील आई-बाबा नोकरी करत असल्याने बºयाचदा मुलांबरोबर संवाद होत नाही. त्यामुळे मुले वाममार्गाला जातात, अशा परिस्थितीत महाविद्यालयातून विद्यार्थ्यांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असेही करमाळकर म्हणाले.
डॉ. करमाळकर यांना प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांच्या हस्ते विशेष सन्मापत्र देऊन त्यांचा बहुमान करण्यात आला.
कुलकर्णी, मोडक, रामदासी, सारडा यांची भाषणे झाली. प्राचार्या रेखी यांनी वार्षिक अहवाल सादर करताना महाविद्यालयाच्या यशाचा आलेखाचा आढावा घेतला. प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. राजीव रिक्कल यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी मानले. या स्नेहसंमेलन सोहळ्यास हिंद सेवा मंडळाचे संचालक डॉ.पारस कोठारी, जगदीश झालानी, अजित बोरा, मकरंद खेर, संजय जोशी, अशोक उपाध्ये, अरुण दुग्गड, बाळासाहेब कुलकर्णी, विठ्ठल ढगे, विठ्ठल उरमुडे, अशोक असेरी, डॉ. ज्ञानदेव जाधव, अमृत गुगळे आदी उपस्थित होते.