कोर्ससाठी आणलेल्या वाहनांवर चढला गंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:00+5:302021-02-06T04:37:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजूर : राजूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे दहा वर्षांपूर्वी मोटार मॅकेनिक कोर्ससाठी आलेले लाखो ...

कोर्ससाठी आणलेल्या वाहनांवर चढला गंज
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : राजूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे दहा वर्षांपूर्वी मोटार मॅकेनिक कोर्ससाठी आलेले लाखो रुपयांचे साहित्य आणि वाहने अद्याप धूळखात पडली आहेत. कोर्ससाठी जागा उपलब्ध नसतानाही आलेल्या लाखो रुपयांच्या वाहनांवर गंज चढला आहे, तर काही जुनी वाहने सडून गेली आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दोन हजारच्या दशकात मोटार मॅकेनिक कोर्ससाठी आवश्यक असणारे साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने या संस्थांमध्ये शासनाने खरेदी करून पोहोच केली. या प्रशिक्षण संस्थेत या कोर्ससाठी जागाच उपलब्ध नसल्याने खोक्यात भरून आलेले साहित्य तसेच गोडाऊनमध्ये साठवून ठेवण्यात आले आले आहे. तर चारचाकी वाहने मोकळ्या जागेत उभी करण्यात आली आहेत. ती अद्याप त्याच अवस्थेत उभी आहेत. मागील सुमारे दहा ते बारा वर्षे ही वाहने ऊन, वारा आणि पाऊस आपल्या अंगावर झेलत असल्याने नव्या कोऱ्या वाहनांवर गंज चढला आहे. विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी आलेल्या जुन्या वाहनांची बिकट अवस्था झाली आहे.
राजूरमध्येही या कोर्ससाठी आवश्यक असणारे लाखो रुपयांचे साहित्य त्यावेळी या प्रशिक्षण संस्थेत आले. त्यावेळी हे केंद्र एका खासगी जागेत चालविले जात होते आणि वेगवेगळे सहा ट्रेड सुरू होते. मात्र, मोटार मॅकेनिक कोर्ससाठी येथे जागाच उपलब्ध होत नसल्याने ही वाहने बाहेरच उभी करण्यात आली होती. इतर साहित्य गोडाऊनमध्ये साठविले होते.
सध्या राजूर येथील हे प्रशिक्षण संस्था स्वतःच्या इमारतीत सुरू आहे. या ठिकाणी फिटर, नळ कारागिर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, शिलाई आणि ड्रेस मेकिंग हे कोर्स सुरू आहेत.
...
अनेक विद्यार्थी कोर्सपासून वंचित
दरवर्षी सुमारे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहात आहेत. असे असले तरी मोटार मॅकेनिक कोर्स सुरू नसल्याने सुमारे अडीचशे ते तीनशे विद्यार्थी कोर्स सुरू न झाल्याने आपला उद्योग व्यवसाय उभे करण्यास मुकले आहेत. या कोर्ससाठी जागाच उपलब्ध नसताना यासाठी आवश्यक असणारे लाखो रुपयांचे साहित्य का खरेदी करण्यात आले? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
...
०५राजूर ट्रक
...
ओळी-राजूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोटार मेकॅनिक कोर्ससाठी आणलेली वाहने धूळखात पडली असून त्या वाहनांवर गंज चढला आहे.