सत्ताधारी-विरोधकांत हमरीतुमरी

By Admin | Updated: June 12, 2016 22:43 IST2016-06-12T22:39:12+5:302016-06-12T22:43:39+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी इमारत बांधकामाच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झालेल्या हमरीतुमरीनंतर गोंधळ होऊन सभा गुंडाळाली गेली.

Ruling-opponent me | सत्ताधारी-विरोधकांत हमरीतुमरी

सत्ताधारी-विरोधकांत हमरीतुमरी

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी इमारत बांधकामाच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झालेल्या हमरीतुमरीनंतर गोंधळ होऊन सभा गुंडाळाली गेली. सभेनंतर सत्ताधारी मंडळाने सभासदांनी एकमुखाने सर्व विषय मंजूर केले असल्याचा दावा केला आहे. तर विरोधी मंडळाच्या संचालक आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच चर्चा न करता सभा संपवत पळ काढला असल्याचा आरोप केला. अन्य काही विरोधकांनी सोसायटी इमारत बांधकामात मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च दाखवण्यात आला असल्याचा ठपका ठेवला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ८९ वी सर्वसाधारण सभा रविवारी पटेल मंगल कार्यालयात पार पडली. सुरुवातीला दोन तास सभासदांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव हजर होते.
पदाधिकारी आणि अधिकारी असेपर्यंत सभा शांततेत पार पडली. मात्र, ते गेल्यावर अवघ्या १५ मिनिटात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा गोंधळ झाला आणि सभा गुंडाळण्यात आली. यावेळी शिक्षक बँकेच्या प्रथेप्रमाणे सर्व विषय मंजुरीचे फलक सभेत झळकवण्यात आले. सभेच्या नियमाप्रमाणे विषय वाचन सुरू असताना विषय मंजुरीचे फलक झळकवण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले.
विरोधकांनी व्यासपीठावर आणि समोर गर्दी केली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी विरोधकांना बोलण्यासाठी माईकही देईना, यामुळे हमरीतुमरी झाली. व्यासपीठावर आणि समोर गोंधळ सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी सभागृह सोडले. विरोधक चर्चा करा, सभेचे सर्व विषय नामंजूर, अशी घोषणा देत होते. विरोधकांकडून संचालक सुभाष कराळे, ए. वाय. नरोटे, विकास साळुंके, महेश साळुंके, अभय गट, सुनीता कदम, शशांक कोतकर, विजय औटी, डॉ. दिनेश क्षीरसागर, सोमनाथ भिटे आक्रमक होते. तर सत्ताधाऱ्यांच्यावतीने संचालक विजय कोरडे, शशिकांत रासकर लढताना दिसले. सभेला काही मद्यप्रेमींनीही हजेरी लावत सभेची रंगत वाढवली.
(प्रतिनिधी)
त्या दोघात बाचाबाची
सभा गुंडाळल्यानंतर मंगल कार्यालयाच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधक गटा-तटाने उभे होते. यावेळी सभासद अंबादास ठाणगे आणि महेश साळुंके यांच्या बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर दोघे एकमेकांवर धावले. अखेर येथे उपस्थित असणाऱ्यांनी दोघांना सोडवले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेतील लोण जि. प. सोसायटीत आल्याबद्दल अनेक सामान्य सभासदांनी नाराजी व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांनी महिला सभासदांना गेल्या मकरसंक्रांतीला बेन्टेक्सच्या बांगड्या भेट दिल्या होत्या. जिल्ह्यातील काही तालुक्यात या बांगड्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. मात्र, राहाता तालुक्यातील महिला सभासद या बांगड्यांपासून वंचित आहेत. त्यांना तातडीने बांगड्या उपलब्ध करून देण्याची मागणी राहाता तालुका क्रास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी शरद मांडुळे यांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी सभेत पहिल्यांदा चुकीचा पायंडा पाडला. यापूर्वी कधीच विषय मंजुरीचे फलक आणले जात नव्हते. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बोलू दिले नाही. वर्षभरातील त्यांच्या कारभारावर सभासदांना चर्चा करायची होती. मात्र, त्यांचा आवाज दाबून टाकण्यात आला आहे. सत्ताधारी सभासद हिताचे नव्हे, तर स्वहिताचे निर्णय घेत आहेत.
- सुभाष कराळे, विरोधी संचालक
सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिलेली आहे. सभेत प्रत्येक सभासदाला स्वतंत्र संधी देण्यात येणार होती. मात्र, विरोधकांनी गोंंधळ घातला. व्यासपीठासमोर सर्व माजी संचालक एकत्र आले. दीड वर्षात सोसायटीत झालेले चांगले काम विरोधकांना देखवत नाही. विरोधक अद्यापही निवडणुकीत पराभव मान्य करत नाहीत. यापुढे संस्थेत पारदर्शक काम करणार.
-विजय कोरडे, सत्ताधारी संचालक
सोसायटी सभेच्या वादाचा केंद्रबिंदू सोसायटीने बांधलेल्या नूतन इमारतीच्या खर्चाचा विषय आहे. आधीच्या संचालक मंडळाने १ कोटी १० लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळ सत्तेत आले. गेल्या वर्षी या मंडळाने इमारतीसाठी २ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता घेतली. प्रत्यक्षात इमारतीवर २ कोटी ८० लाख रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे. यासह फर्निचर, वीजजोड कामाच्या निविदा काढण्यात आल्या नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
सभेत अध्यक्षा गुंड यांनी त्यांच्या भाषणात वारंवार सत्ताधाऱ्यांनी सभासदांना पारदर्शीपणे हिशोब द्यावा, जेणेकरून गोंधळ, भ्रष्टाचाराचा आरोप होणार नाही, असे सांगितले होते. गुंड हे असे का सांगत होत्या, हे त्या निघून गेल्यावर झालेल्या गोंधळातून उघड झाले. सभेत विरोधकांनी अहवालाच्या प्रती, विषय मंजुरी फलक फाडून टाकले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच गोंधळात सभा गुंडाळण्याची वेळ आली.
मागील संचालक मंडळाने उपव्यवस्थापकाच्या नावावर अडीच लाख रुपये हातावर काढलेले आहेत. यासह सत्ताधाऱ्यांनी इमारतीचा खर्च कसा वाढवला, याची चौकशी होणे आवश्यक आहे. सभेत सभासदांना बोलू देणे गरजेचे होते.
- सोमनाथ भिटे, सभासद
आजी-माजी संचालकांच्या कार्यकाळात इमारतीच्या खर्चाला मान्यता आणि खर्च करण्यात आलेला आहे. हा खर्च अनियमित असून इमारतीच्या बांधकामाची चौकशी होण्यासाठी समिती नेमण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात येणार आहे. सत्ताधाऱ्यांनी सभेत विषय मंजुरीचे फलक आणण्याची चुकीची प्रथा सुरू केली आहे, याचा निषेध. -ए. वाय. नरोटे, सभासद.

Web Title: Ruling-opponent me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.