रिपाई, भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांचा जेल भरो; श्रीरामपुरात आंदोलन
By शिवाजी पवार | Updated: October 11, 2023 14:53 IST2023-10-11T14:53:03+5:302023-10-11T14:53:45+5:30
हरेगाव प्रकरणातील आरोपीच्या अटकेची मागणी

रिपाई, भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांचा जेल भरो; श्रीरामपुरात आंदोलन
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : हरेगाव येथील तरुणांच्या अमानुष मारहाण प्रकरणातील फरार आरोप नाना गलांडे याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी रिपाइं व भीमशक्तीने मंगळवारी जेल भरो आंदोलन केले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात नेले. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
शहरातील रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मंगळवारी कार्यकर्ते जमा झाले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आरोपी नाना गलांडे याला त्वरित अटक करावी, टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, सावकारकीच्या धंद्यातून लुबाडलेल्या लोकांच्या जमिनी व दुकाने परत कराव्या, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केल्याप्रमाणे हरेगाव येथे ग्रामसभा घेण्यात यावी, अशा घोषणा देण्यात आल्या. रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.