दरोडीवर दरडींची टांगती तलवार
By Admin | Updated: August 2, 2014 00:59 IST2014-08-02T00:01:18+5:302014-08-02T00:59:05+5:30
विनोद गोळे, पारनेर डोंगराच्या कुशीतच घरे आणि डोंगरावर मोठमोठे दगड अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीचा सामना
दरोडीवर दरडींची टांगती तलवार
विनोद गोळे, पारनेर
डोंगराच्या कुशीतच घरे आणि डोंगरावर मोठमोठे दगड अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीचा सामना करीत पारनेर तालुक्यातील दरोडी येथील तीस ते चाळीस कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरुनच येथे राहत आहेत.
पारनेर-अळकुटी मार्गावर अळकुटी जवळ पाच किलोमीटर अंतरावर दरोडी गाव आहे. हिंदू-मुस्लीम धर्मीयांचे हजरत चिश्ती महंमद यांचा येथे प्रसिध्द दर्गा आहे.
गावात गेल्यावर या दर्ग्याचे प्रथम दर्शन होते. येथे ३५-४० कुटुंब येथे राहतात. ग्रामपंचायतीने काही नागरिकांना घरकुल बांधून दिले आहे़ मात्र, बहुतेक घरे डोंगराच्या कुशीतच आहेत़ निसर्गाच्या प्रकोपाने या डोंगरावरील दगड किंवा दरड कोसळल्यास ते थेट घरांवरच घाला घालणार आहेत़ गावाचा काही भाग त्यापासून दूर आहे़ मात्र, त्यालाही धोका आहेच. या डोंगरावरुन पाहिल्यास गाव पूर्णत: दरडीखाली असल्याचे चित्र दिसते. या डोंगरांवर खूप मोठ्या आकारांचे दगड आहेत़ हे दगड केव्हाही घसरतील अशा स्थितीत आहेत़ हे दगड कोसळल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
माळीण गावाच्या धर्तीवर हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे. गुरुवारी दुपारी तहसीलदार दत्तात्रय भावले, आपत्ती व्यवस्थापनचे सचिन शिंदे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली व हे धोकादायक दगड काढण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
त्यांना घर सोडून पळावे लागते
दरोडीमधील डोंगराच्या कुशीत राहणाऱ्यांना अनेक वेळा मोठे दगड पडल्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन घर सोडून पळावे लागले आहे. येथील रहिवासी दिनकर गायकवाड व जगन मोहिते यांच्या कुटुंबीयांवर असा प्रसंग एकदा घडला होता. डोंगरावरुन घरंगळत आलेला मोठा दगड त्या दोघांच्या घरांमधील जागेत अडकला़ त्यावेळी त्या कुटुंबांना लांबवर पळावे लागले होते़ याचा अनुभव सांगताना त्या कु टुंबीयांना व उपसरपंच लक्ष्मण कड यांना अंगावर शहारे
आले होते.