रोहित पवारांनी पंतप्रधानांची उंची मोजू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:31+5:302021-06-18T04:15:31+5:30
जामखेड (अहमदनगर) : आमदार झाल्यापासून रोहित पवारांना स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान ...

रोहित पवारांनी पंतप्रधानांची उंची मोजू नये
जामखेड (अहमदनगर) : आमदार झाल्यापासून रोहित पवारांना स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
पडळकर यांनी गुरुवारी सकाळी जामखेड तालुक्यातील चुंबळी, बावी येथे अठरापगड जाती, ओबीसी समाज, गरीब मराठा यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पडळकर म्हणाले, रोहित पवार हे पोस्टरबॉय आहेत. ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात मंजूर झालेल्या कामांचा ते प्रारंभ करीत आहेत. काम करायला कधी कधी आणि श्रेय घ्यायला सर्वांत आधी अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कोंबड्यांचे दिलेले खाद्यही निकृष्ट दर्जाचे निघाले. पवारांनी कोठेही पेरले तर तेथे घोटाळाच उगवणार, हे यातून सिद्ध हाेते, असा आराेप पडळकर यांनी केला.
---
राज्यात कोणाच्याही खात्याविषयी कोणीही बोलतेय..
गृहमंत्र्यांचा विषय असला तर कामगार मंत्री बोलतात. शिक्षणमंत्र्यांचा विषय असला तर ग्रामविकासमंत्री बोलतात. कोणाच्या खात्याविषयी कोणीही बोलते. यांना जनतेचे काहीही देणेघेणे नाही. निर्णय कोणी घेतला तर थोड्यावेळाने कोणी तरी म्हणतेय की, आम्ही तसा निर्णय घेतलाच नाही. त्यामुळे महाआघाडी सरकारमध्ये कोण काय करतेय काहीच कळत नाही, अशीही टीका पडळकर यांनी केली.