पेट्रोलपंपावर दरोडेखोरांचा धुमाकूळ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:09+5:302021-08-02T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर-सोलापूररोडवरील साकत (ता.नगर) शिवारातील केतन पेट्रोलपंपावर रविवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला. पिस्टल ...

पेट्रोलपंपावर दरोडेखोरांचा धुमाकूळ,
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर-सोलापूररोडवरील साकत (ता.नगर) शिवारातील केतन पेट्रोलपंपावर रविवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला. पिस्टल व इतर हत्याराच्या सहाय्याने दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील कर्मचारी तसेच पंपावर थांबलेल्या ट्रकचालकांवर हल्ला करून त्यांच्याकडील रोख रक्कम, अंगावरील सोने, मोबाइल असा एकूण २ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लुटला.
रविवारी पहाटे पेट्रोलपंपावरील कर्मचारी व पंपावर वाहन घेऊन थांबलेले चालक झोपेत असताना सात दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढविला. कर्मचाऱ्यांना मारहाण करत पेट्रोलपंपाच्या काउंटरमधील रोख १ लाख ४७ हजार रुपये तसेच पाच ट्रक चालकांककडील रोख रक्कम, बोटातील चांदीच्या अंगठ्या व मोबाइल हिसकावून नेले. दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचारी अविनाश काळे याच्या डोक्यात कुलूप मारल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे मालक अक्षय कुडलिक गोल्हार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांचा तत्काळ शोध सुरू केला असून, विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी सहायक निरिक्षक सानप हे पुढील तपास करत आहेत. या घटनेेने साकत परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सराईत दरोडेखोरांच्या टोळीचेच हे कृत्य असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
-------------------
फोटो ०१ दरोडा
ओळी- दरोड्याच्या घटनेनंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह पेट्रोलपंपावर भेट देऊन माहिती घेतली.