हातगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:01+5:302021-06-20T04:16:01+5:30
शेवगाव : तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी (दि.१९) रात्री एकच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर एका ...

हातगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ
शेवगाव : तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी (दि.१९) रात्री एकच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर एका ठिकाणी दरोडा टाकून बाप-लेकाला मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी चोरांनी पाच तोेळे सोन्याचे दागिने, साठ हजाराची रोकड लंपास केली.
दिलीप रामराव झंज व त्यांच्या मुलगा प्रकाश दिलीप झंज अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी रात्रीपासूनच हातगावात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. पहाटे तीन वाजेपर्यंत गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता, अशी माहिती गावचे सरपंच अरुण मातंग यांनी दिली.
चोरट्यांनी दिलीप झंज यांच्या घराचा रात्री एकच्या सुमारास मुख्य दाराचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. घरात झोपलेले दिलीप झंज व मुलगा प्रकाश झंज यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. घरातील ६० हजारांची रोकड, पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेनंतर सरपंच व गावातील लोकांनी पोलिसांना संपर्क साधला. मात्र पोलीस सकाळी नऊच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती सरपंच मातंग यांनी दिली. जखमी बाप-लेकास नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, बोधेगाव क्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी. याप्रकरणी शोभा झंज यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. येथे चोरी करणारे घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हातगावातच इतर तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी दिली.
--------
चोरांच्या मारहाणीत गावातील बाप-लेक जबर जखमी झाले. त्यानंतर नंदू अभंग यांच्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळविला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. यादरम्यान गावातील काही नागरिकांनी या घटनेसंदर्भात पोलिसांना पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास कळविले होते. मीही पाचच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
-अरुण मातंग,
सरपंच, हातगाव
---
१९ हातगाव
हातगाव येथे चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी करताना पोलीस कर्मचारी.