श्रीरामपूरमधील नगरसेवकाच्या बंगल्यात दरोडा
By Admin | Updated: May 29, 2014 00:27 IST2014-05-28T23:38:23+5:302014-05-29T00:27:03+5:30
श्रीरामपूर : नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांच्या निवारा हौसिंग सोसायटीतील बंगल्यात बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडा पडला.

श्रीरामपूरमधील नगरसेवकाच्या बंगल्यात दरोडा
श्रीरामपूर : नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांच्या निवारा हौसिंग सोसायटीतील बंगल्यात बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडा पडला. यात सुमारे १ लाखांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या दगडफेकीत बिहाणी यांच्या पत्नी राखी जखमी झाल्या. पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्या बंगल्याजवळही दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ५ दरोडेखोरांपैकी दोघे बंगल्यात घुसले, तर तिघे बाहेरच होते. बंगल्याचा रखवालदार खैरे याच्या छातीवर चाकू ठेवून गप्प बसण्याचा दम देऊन त्यास डांबून ठेवले. त्यानंतर दरोडेखोर बंगल्याच्या मागील बाजूने स्वयंपाक घराच्या बाजूने आत घुसले. दरवाजाची कडी एका तारेच्या सहाय्याने उघडून त्यांनी मुख्य बंगल्यात प्रवेश मिळविला. स्वयंपाक घराच्या मागील भिंतीवर बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी तोडला. बंगल्यातील अन्य कॅमेर्यांनी मात्र घटनाक्रम टिपला. बिहाणी व त्यांच्या पत्नी राखी झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्यांच्या आई गंगूबाई, कन्या सिद्धी व मुलगा अभिषेक हे तिघे झोपलेल्या दुसर्या खोलीचा दरवाजा उघडा होता. या खोलीत येऊन दरोडेखोरांनी उचकापाचक केली. सिद्धी हिला जाग आली, पण दरोडेखोरांना पाहून भीतीने पुन्हा पडून राहिली. बिहाणींच्या बेडरूमच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न होत असताना राखी यांना जाग येऊन त्या उठल्या.मुलगीच दरवाजा वाजवित असल्याचे समजून त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा दरोडेखोरांनी एक दगड त्यांच्या दिशेने भिरकावला. तो डोळ्याच्या खाली गालावर लागून त्या जखमी झाल्या. त्यांनी तोच दगड उचलून शिताफीने दरोडेखोरांच्या दिशेने फेकून पतीला उठविले. ते उठताच त्यांनी पिस्तूल काढ, असे ओरडताच दरोडेखोर गडबडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. राखी यांनी प्रसंगावधान राखून बेडरूमचा दरवाजा लावून घेतल्याने अनर्थ टळला. दरोडेखोरांनी पँटच्या खिशातील १५ हजार तसेच कपाटातील १५ हजार रूपये, भगवान बालाजींचे चित्र असलेले २० ग्रॅमचे सोन्याचे नाणे, चांदीचे शिक्के, मनगटी घड्याळ असा सुमारे १ लाखांचा ऐवज लुटून नेला. बिहाणी यांनी त्वरित उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, वैभव लोढा, संजय गोसावी, पप्पू ठक्कर व अन्य मित्रांना तसेच पोलिसांना फोन करून बोलाविले. तातडीने पोलीस व मित्र जमा झाले. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन शहराची नाकेबंदी केली. पण दरोडेखोर पसार झाले. (वार्ताहर) बंगल्यातील सी.सी.टी.व्ही.कॅमेर्यात दरोडेखोरांचे पुसट चेहरे कैद झाले आहेत. पहाटे २.२०वाजता घटनेची नोंद झाली. दरोडेखोरांनी अंगावरील शर्ट काढून तोंडे बांधलेली दिसत आहेत. दरोडेखोर लपतछपत घरात घुसताना कॅमेर्यात टिपले आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे या दरोडेखोरांचा तपास लागण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.