राज्यमार्ग सात तास ठप्प
By Admin | Updated: December 16, 2015 23:09 IST2015-12-16T22:56:38+5:302015-12-16T23:09:46+5:30
राशीन : कुकडीचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी दौंड-उस्मानाबाद महामार्गावर कर्जत तालुक्यातील धुमकाई फाट्यावर शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको केला़

राज्यमार्ग सात तास ठप्प
राशीन : कुकडीचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी दौंड-उस्मानाबाद महामार्गावर कर्जत तालुक्यातील धुमकाई फाट्यावर शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको केला़ सुमारे सात तास सुरू असलेले आंदोलन पाणी सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले़
सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे़ या आवर्तनातून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी सकाळी बारडगाव दगडी, तळवडी, येसवडी, पिंपळवाडी, करमनवाडी येथील शेकडो शेतकरी अचानक दौंड-उस्मानाबाद महामार्गावर आले़ धुमकाई फाट्यावर महामार्गाच्या मधोमध बसकन मांडून रास्तारोको आंदोलन सुरू केले़
‘टेल टू हेड’ पाणी सोडलेले असताना आम्हाला पाणी देण्यास अधिकारी का टाळाटाळ करतात, प्रत्येक आवर्तनावेळी आम्हाला आंदोलन करण्याची पाळी का येते, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले़ सकाळी ९ वाजता अचानक पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला सहा तास उलटूनही कुकडी विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही़ त्यामुळे पाणी मिळाल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी कुकडी प्रशासनविरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या़
या आंदोलनात शहाजी कदम, शशिकांत लेहणे, बाळासाहेब मरळ, सुभाष राऊत, दादासाहेब कांबळे, शिवाजी गुळमे, मनोहर राऊत, काशिनाथ थोरात, नवनाथ शिंदे, अशोक तुरकुंडे, अशोक बनसोडे, डॉ. रवींद्र जंजिरे, तात्याराम गवळी, दत्तू पाटील, शिवाजी तुरकुंडे, भाऊसाहेब राऊत आदींनी सहभाग घेतला़
रास्ता रोको आंदोलन सात तास चालल्याने दौंड-उस्मानाबाद महामार्गावर वाहनांनी मोठी कोंडी झाली होती. (वार्ताहर)