आंबी दुमाला फाटा ते म्हसवंडी रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:19+5:302021-02-25T04:25:19+5:30
घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा ते म्हसवंडी या रस्त्याचे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम ...

आंबी दुमाला फाटा ते म्हसवंडी रस्त्याचे काम निकृष्ट
घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा ते म्हसवंडी या रस्त्याचे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रस्ताकामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा (आंबी दुमाला) ते म्हसवंडी या ६ किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम सुरू आहे. सुमारे २ कोटी ९७ लाख ९३ हजार रुपयांचा निधी या रस्त्याला मंजूर झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम फारच मंदगतीने सुरू आहे. या रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी मातीमिश्रीत असून डांबर कमी वापरले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असतानाच काही ठिकाणी खडी निघाली आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ता बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सावकार शिंदे, शैलेश शिंदे, विष्णू ढेरंगे, रामदास नरवडे, महादु राखुंडे, मारूती ढेरंगे, देवराम देसले, तुषार ढेरंगे, गणपत नरवडे, नवनाथ नरवडे आदी ग्रामस्थांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
....
आंबी फाटा (आंबी दुमाला) ते म्हसवंडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. डांबरीकरणापूर्वीच रस्ता उखडला आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
-उत्तम ढेरंगे, माजी उपसरपंच, आंबी दुमाला, ता. संगमनेर.