जवखेडे खालसा, जवखेडे दुमाला, कासारवाडी, कामत शिंगवे, कोपरे, ढवळेवाडी या सहा गावांचे नित्याचे दळवळण यामुळे बंद झाल्याने परिसरात सार्वत्रिक असंतोष आहे. रहदारीसाठी थेट सात किलोमीटर अंतराचा वळसा घालून वृद्धेश्वर कारखाना मार्गे नागरिकांना जावे लागत आहे. जेसीबी यंत्राने रस्ता अडविण्याचे काम सुरु असतानाच तेथील शेतकरी बांधकाम अभियंत्यांना भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करीत होते. अभियंते फोन घेत नसल्याने हनुमान टाकळी येथील वृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ बर्डे, ग्रामपंचायत सदस्य निलेश काजळे, बाळासाहेब बर्डे, बाबासाहेब बर्डे, शेवंताबाई बावणे यांच्यासह दोनशे ग्रामस्थ पाथर्डीचे बांधकाम विभाग कार्यालयात गेले. तेथील उपस्थित अधिकाऱ्यांना रस्ता खोदकाम प्रकरणी जाब विचारला. त्यानंतर रस्ता अडवणूक झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन स्थळ पंचनामा केला. रस्ता पूर्ववत करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, अशी लेखी मागणी बांधकाम विभागाचे वतीने पाथर्डी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. पोलीस संरक्षण मागणी अर्ज मंजूर झाला असल्याने रस्ता खुला होण्याची आस रहिवाशांना लागली आहे.
रस्ता होणार खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST