वाघुंडे बुद्रुक येथील रस्ता होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:12+5:302021-07-07T04:27:12+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक येथील रस्ता चकाचक होणार असून, नगर-पुणे महामार्गापासून गावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी ...

वाघुंडे बुद्रुक येथील रस्ता होणार चकाचक
सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक येथील रस्ता चकाचक होणार असून, नगर-पुणे महामार्गापासून गावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेतून १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे.
नगर-पुणे महामार्गापासून वाघुंडे बुद्रुक गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत होते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड होते. वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी निधी वर्ग झाला असून, लंके यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा नुकताच प्रारंभही करण्यात आला आहे. तसेच गावात चार लाख रुपये खर्चातून गावठाण अंतर्गत रस्ता, तर सात लाख रुपये खर्च करून दिवटे वस्ती ते वाघुंडे बुद्रुक रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने गावातील रस्ते चकाचक झाले असल्याने गावकरी सुखावले आहेत.
दलितवस्तीतील सांडपाणी व्यवस्थेसाठी दोन लाख रुपये खर्चून ड्रेनेजचे काम करण्यात येणार आहे. तसेच शवदाहिनीसाठी ९४ हजार, स्मशानभूमी परिसर विकासासाठी साडेचार लाख रुपये निधी लंके यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचे सरपंच संदीप वाघमारे व उपसरपंच लताबाई रासकर, शरद रासकर यांनी सांगितले.