गॅस पाईपलाईनच्या कामाने रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:31+5:302021-03-13T04:37:31+5:30
श्रीगोंदा : शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारत सीएनजी घरगुती गॅस ‘होम कनेक्शन’चे काम सुरू आहे. या कामामुळे शहरातील रस्ते ...

गॅस पाईपलाईनच्या कामाने रस्त्याची दुरवस्था
श्रीगोंदा : शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारत सीएनजी घरगुती गॅस ‘होम कनेक्शन’चे काम सुरू आहे. या कामामुळे शहरातील रस्ते व पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन, टेलिफोन केबल ठिकठिकाणी तुटली आहे. या विरोधात दक्ष फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांंनी गांधीगिरी करत पालिकेस हे काम बंद करण्यास भाग पाडले आहे.
श्रीगोंदा शहराचा रस्ते, पाईपलाईन विस्तार मोठा आहे. भारत गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने पालिकेस ४५ लाखांच्या नुकसान भरपाई पोटी भरले आहेत. मात्र हे नुकसान अधिक आहे. त्यामुळे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी हे काम थांबविण्याचा निर्णय घेतला. या पाईपलाईनमुळे रस्ते व पाईपलाईनचे किती नुकसान होते याची माहिती घेऊन नुकसानीचा
आकडा निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात येणार आहे.
हे काम एका मशीनच्या सहाय्याने तीन फूट खोल जमिनीच्या आतून एका वेळेस शंभर फूट आडवे बोअरिंग केले जाते. परंतु, हे बोअरिंग करताना पिण्याच्या पाण्याचे पाईप फुटत होते. एकच पाईप २० ते २५ ठिकाणी फुटला आणि शहरात गोंधळ उडाला.
पालिकेने कोट्यवधी खर्च करून पूर्ण शहराला फिल्टरचे पाणी आणले आहे. मात्र ही मशीन हे पाईप फोडत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. शिवाय दुरुस्ती करताना रस्त्यावर खोदकाम केले जाते. यामुळे नुकतेच केलेले रस्ते खराब होत असल्याने हे नुकसान नगरपालिकेस परवडणारे नाही. त्यामुळे दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता जगताप, डॉ. दत्ता बनसोडे यांनी बोअरिंग करणाऱ्या मशीनची पूजा करून गांधीगिरी केली. मात्र पालिकेचे लक्ष वेधले.
---
११ श्रीगोंदा
श्रीगोंदा शहरात दक्ष फाउंडेशनच्या वतीने मशीनची पूजा करून गॅस पाईपलाईनचे काम बंद करण्यासाठी गांधीगिरी करण्यात आली.