नदीला पूर, शेवगाव-गेवराई मार्ग पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:19+5:302021-09-02T04:45:19+5:30
बोधेगावसह परिसरातील बहुतांशी गावे सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने झोडपून निघाली आहेत. तब्बल सहा ते आठ तास अतिवृष्टीचा तडाखा ...

नदीला पूर, शेवगाव-गेवराई मार्ग पाण्याखाली
बोधेगावसह परिसरातील बहुतांशी गावे सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने झोडपून निघाली आहेत. तब्बल सहा ते आठ तास अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने काशी नदीसह ओढे, नाले, तलाव व बंधारे तुडुंब भरून वाहत होते. बोधेगावच्या काशी नदीला पूर आल्याने या पुलावरून शेवगाव- गेवराई मार्गाची वाहतूक पहाटे चार ते सकाळी अकरापर्यंत ठप्प झाली होती. तर याच मार्गावरील काळ्या ओढ्यावरील पुलावरून पाणी सायंकाळी उशीरापर्यंत वाहत होते. त्यामुळे लहान वाहने, दुचाकी व पादचाऱ्यांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद होती. एसटी बस, खासगी चारचाकी गाड्या, मालवाहू वाहने यांच्यासह दुचाकी आणि पादचारी नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथील नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून एकाने आपला मालवाहू ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या वेगाने हा ट्रक नदीपात्रात कोसळून अडकला. ट्रक चालक व्ही. गोविंद स्वामी (रा.तामिळनाडू) हा ट्रकवर चढून मदतीची विनंती करीत होता. तब्बल दोन-तीन तास तो ट्रकवर उभा राहिला. पाणी थोडे कमी झाल्यानंतर पोलीस व नागरिकांनी त्याची सुटका केली.
..............
फोटो ओळ : शेवगाव-गेवराई मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते.. (छायाचित्र-निलेश वडघणे)