पदोन्नती नाकारण्याचा अधिकार
By Admin | Updated: July 26, 2014 00:33 IST2014-07-25T23:07:15+5:302014-07-26T00:33:08+5:30
अहमदनगर: पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती घेण्याची इच्छा नसेल तर तसा अधिकार शिक्षकांना असावा

पदोन्नती नाकारण्याचा अधिकार
अहमदनगर: पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती घेण्याची इच्छा नसेल तर तसा अधिकार शिक्षकांना असावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी मान्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना आपला नकाराधिकार आता २५ ते २७ जुलै पर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नोंदविता येईल, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे व उपसरचिटणीस शरद वांढेकर यांनी दिली.
पदवीधर शिक्षकांना २६ व २७ जुलैला पदोन्नती देण्यात येणार आहे. शिक्षकांची इच्छा असो वा नसो त्यांना एकतर्फी पदोन्नती देण्यात येणार होती. त्यामुळे अनुच्छुक शिक्षकांना स्वत: जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहून नकार नोंदवावा लागणार होता. अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागातील शिक्षकांनाही केवळ नकार कळविण्यासाठी नगरला यावे लागणार होते. शिक्षक संघाने ही बाब शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद व उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संघटनेची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे पदोन्नती घेण्याची इच्छा नसणाऱ्या शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन निमसे, राज्यसंघटक कल्याण लवांडे, बाळासाहेब कदम, विष्णू बांगर, विलास लवांडे, माधव गोडे, लक्ष्मण चेमटे, सुनील शिंदे, मच्छिंद्र कडाळी, सुधीर रणदिवे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)