मोहोजखुर्दला दरोडा
By Admin | Updated: January 16, 2016 23:09 IST2016-01-16T23:04:44+5:302016-01-16T23:09:38+5:30
पाथर्डी : तालुक्यातील मोहोजखुर्द खंडोबानगर येथील ठोकळ वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात आठ ते नऊ जणांच्या टोळीने जगन्नाथ ठोकळ यांच्या घरावर दरोडा टाकीत दागिने घेऊन पोबारा केला़

मोहोजखुर्दला दरोडा
पाथर्डी : तालुक्यातील मोहोजखुर्द खंडोबानगर येथील ठोकळ वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात आठ ते नऊ जणांच्या टोळीने जगन्नाथ ठोकळ यांच्या घरावर दरोडा टाकीत ठोकळ दाम्पत्यास जबर मारहाण करीत सुमारे २८ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला़
शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते १ वाजण्याच्या सुमारास ठोकळ कुटुंबीय झोपेत असताना दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला़ ठोकळ दाम्पत्याला जाग आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून गज, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ठोकळ यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच मुलीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने असा मिळून २७९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ठोकळ यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला असून, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले हे पुढील तपास करीत आहेत़ घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, श्रीराम शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले़ मात्र, दरोडेखोरांचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आले़ दरम्यान, त्याच रात्री काशीनाथ आव्हाड व ताजमहंमद शेख (रा.कासारवाडी) यांच्या घरीही चोरी झाली़ ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.