सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 15:30 IST2020-07-12T15:30:06+5:302020-07-12T15:30:50+5:30
भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती
हेमंत आवारी।
अकोले : भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतक-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
बायफ संस्थेच्या पुढाकाराने तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील मान्हेरे, आंबेवंगण, टिटवी, कोदणी, खिरविरे, पेढेवाडी, तिरडे, पाचपट्टा या भागात सगुणा तंत्रज्ञानाने भाताची लागवड केली आहे. आदिवासी भागात भात हे मुख्य पीक असून यावरच अर्थकारण अवलंबून असते. पारंपरिक पध्दतीने भात लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी ‘राप’ पध्दत वापरली जाते. यामुळे पालापाचोळा व शेणखत बायोमास जाळला जातो. धुरामुळे प्रदूषण होते. अनेक जीवजंतू व उपयुक्त असे जीवाणू नष्ट होतात. रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड म्हणजेच आवणी केली जाते. चिखलनी आवणी कामासाठी कष्ट जास्त पडतात.
सगुणा भात लागवड तंत्रज्ञान वापरून लागवड करताना १४० सेंटीमीटर रुंदीचे व २० सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून त्यावर बियाणे पेरतात. त्यामुळे लागवडीचा परत खर्च येत नाही. बियानेही कमी लागते. लागवड करताना दोन बिया व दोन ओळीतील अंतर २५ बाय २५ सेंटीमीटर ठेवतात. रासायनिक खतांचे व्यवस्थापन तण नियंत्रण ही कामेही सोपी होतात. भात कापणीनंतर याच वाफ्यांवर हरभरा, कडूवाल यासारखी पिके घेता येतात.
आदिवासी भागातील लोक आजही इर्जुकीने भात आवणी करतात. आता नव्या तंत्रज्ञानाचे महत्व पटत चालले असून काही शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे.
गतवर्षी ९५ शेतक-यांचा होता सहभाग
गतवर्षी ९५ शेतकरी या सगुणा प्रयोगात सहभागी झाले होते. पीक उत्पादनात चांगला फरक जाणवल्याने यावर्षी काळू करवंदे, किसन बांबेरे (कोदणी), देवराम भांगरे (देवगाव), बाळू गोडे(शेणीत) अशा दोनशे पेक्षा अधिक शेतक-यांनी सगुण पध्दतीने भात लागवड केली आहे. शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. बायफचे जतीन साठे, राम कोतवाल, लीला कुर्हे यांनी हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले आहे.