रिव्हॉल्व्हरचा ‘तो’ परवाना निलंबित ?

By Admin | Updated: June 17, 2014 00:35 IST2014-06-16T23:48:19+5:302014-06-17T00:35:35+5:30

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान चुकून गोळी सुटलेल्या रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये वापरकर्ते संभाजी रोहोकले यांचा निष्काळजीपणा कारणीभूत

Revolver suspended 'it' license? | रिव्हॉल्व्हरचा ‘तो’ परवाना निलंबित ?

रिव्हॉल्व्हरचा ‘तो’ परवाना निलंबित ?

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान चुकून गोळी सुटलेल्या रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये वापरकर्ते संभाजी रोहोकले यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. त्यामुळे या रिव्हॉल्वरचा परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला असून तो नगरच्या प्रांताधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
रविवारी मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेत्यांच्या उपस्थितीत सभा सुरू होती. या सभेतून बाहेर पडल्यानंतर संभाजी रोहोकले यांची कमरेच्या डाव्या बाजुला लावलेली रिव्हॉल्वर खाली पडली. ती लोडेड असल्याने त्यामधून गोळी सुटली आणि ती छताला लागली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला आहे. रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये रोहोकले यांनी निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. रिव्हॉल्वरची नियमित साफसफाई त्यांनी अनेक दिवसांपासून केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी . रोहोकले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अदखलपात्र गुन्हा नोंदवून पोलिसांनी रोहोकले यांची जामिनावर सुटका केली आहे. (प्रतिनिधी)
‘तो’ परवाना राज्याचा
रोहोकले यांनी २००६ मध्ये स्वसंरक्षणासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी परवाना घेतला होता. एक वर्षापूर्वी त्यांनी हा परवाना महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी करून घेतला. त्यामुळे त्यांना कोणत्याही ठिकाणी शस्त्र वापरण्याची परवानगी होती. कुठेही जावू द्या, नेहमीच शस्त्रं बाळगतो, असे त्यांचे उत्तर होते. रोहोकले हे निवृत्त मुख्याध्यापक असताना त्यांना शस्त्र कशासाठी़़? असा पोलिसांनी सवाल केला आहे. ठेकेदारी करीत असल्याने स्वसंरक्षणाची गरज असून त्यासाठीच शस्त्र बाळगत असल्याचे रोहोकले यांनी सांगितले.
सभेत रिव्हॉल्वर कसे?
एखादी सभा असली तर पोलीस बंदोबस्त नियुक्त केला जातो. सभेला मोठे नेते येणार असले तर मेटल डिटेक्टरसह अन्य तपासण्या केल्या जातात. तसेच कोणाकडे शस्त्र आहेत का याचीही पोलीस तपासणी करतात. मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातील मोठे नेते, मंत्री येणार असल्याचे अपेक्षित होते. त्यामुळे सभास्थळी पुरेसा बंदोबस्त असला तरी नागरिकांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कोणाकडे शस्त्र आहेत का? हे आढळून आले नाही. शोकसभा असल्याने तपासणी किंवा मेटल डिटेक्टर ठेवण्याची आवश्यकता नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Revolver suspended 'it' license?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.