परिवर्तनाचा लढा यशस्वी!
By Admin | Updated: April 9, 2016 00:31 IST2016-04-09T00:21:06+5:302016-04-09T00:31:42+5:30
अहमदनगर : शिंगणापूर देवस्थानमधील समतेच्या लढाईला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर यश आले.

परिवर्तनाचा लढा यशस्वी!
अहमदनगर : शिंगणापूर देवस्थानमधील समतेच्या लढाईला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर यश आले. मात्र, ही लढाई १८ वर्षांपासून सुरू होती. शिंगणापुरातील चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश हवा, ही मागणी सर्वप्रथम डॉ. नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली होती.
१९९८ साली सोनई येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद यशवंतराव गडाख यांना देण्यात आले होते. अधिवेशनातील एका परिसंवादास डॉ. दाभोलकरही उपस्थित राहणार होते. मात्र अधिवेशनापूर्वीच दाभोलकरांचे ‘चला चोरी करायला शिंगणापूरला’ हे विधान गाजले. खरे तर दाभोलकरांनी हे विधान वेगळ्या संदर्भाने केले होते. गावकऱ्यांची श्रद्धा दुखावण्याचा त्यांचा काहीही इरादा नव्हता. मात्र, गैरसमज निर्माण केले गेले. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद उफाळला. सोनई येथे होणारे अधिवेशनच उधळण्याचा इशारा काही संघटनांनी दिला. पर्यायाने सोनईचे अधिवेशन रद्द करून ते तरवडी (ता. नेवासा) येथे हलवावे लागले. या वर्षापासूनच शिंगणापुरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळायला हवा, ही मागणी अंनिसने सुरू केली.
या मागणीसाठी २००० साली दाभोलकर, व्यंकटराव रणधीर, पन्नालाल सुराणा, निशा भोसले, बाबा अरगडे, शालिनी ओक यांनी नगरला सद्भावना उपोषण केले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी या उपोषणालाही त्या वेळी मोठा विरोध केला. नेते व कार्यकर्त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.
चौथऱ्यावर जाऊन शनीचा कोप बघा, असे आव्हान त्या वेळी दाभोलकर यांना दिले गेले. त्यामुळे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, बाबा आढाव, एन.डी. पाटील, पुष्पा भावे हे शिंगणापूरचा चौथरा चढण्यासाठी निघाले होते. मात्र, या सर्वांना नगरजवळच अटक झाली. दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका झाली. नगर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पी.बी. कडू पाटील व राज्य कार्यवाह बाबा अरगडे हे या लढ्याची सर्व सूत्रे सांभाळत होते. अगरडे यांच्या नेवासा फाटा येथील घरावर या प्रकरणात हल्लाही झालेला आहे. अरगडे यांना त्यानंतर सहा महिने पोलीस संरक्षण होते. त्यांना जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते. दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी अरगडे यांची तडीपारी रद्द करण्यासाठी नगरला मोर्चा काढला होता. याच विषयावर पंढरपूर ते नगर अशी समता दिंडीही काढण्यात आली होती.
दाभोलकरांनी या विषयावर २००१ साली याचिका दाखल केली. ती अद्यापही प्रलंबित आहे. घटनेने स्त्री-पुरुष समता सांगितलेली आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र हे तत्त्व पाळले जावे. सर्व जाती-धर्मांतील स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच उपासनेचे स्वातंत्र्य आहे, अशी व्यापक मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेच्या निकालाची अजून प्रतीक्षा आहे. दाभोलकर आज हयात नाहीत. मात्र, त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे. (प्रतिनिधी)
दाभोलकर नेमके
काय म्हणाले होते?
‘चला चोरी करायला शिंगणापूरला’ ही दाभोलकरांची घोषणा गाजली. पण, दाभोलकरांनी हे विधान वेगळ्या संदर्भाने केले होते. १९९८ साली सोनईत होणाऱ्या सत्यशोधक परिषदेच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकार पुण्यात दाभोलकरांना भेटले. सोनईच्या जवळच शिंगणापूर हे गाव असून तेथील घरांना दरवाजे नाहीत, तेथे चोरी होत नाही, असे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणले होते. त्यावर दाभोलकर ‘अरे वा, चला मग चोरी करायला’ असे सहजपणे उद्गारले. पण त्यांच्या या विधानाचीच मोठी बातमी झाली व वाद उफाळला. आपण कोणत्याही श्रद्धेच्या विरोधात नाहीत. मात्र, अंधश्रद्धा आपणाला मंजूर नाही, असे त्यानंतर ते वारंवार सांगत राहिले.
‘ती’ने घडविले परिवर्तन
अहमदनगर : चारशे वर्षांची परंपरा खंडित होऊन महिलांनी शनीचा चौथरा चढला त्याचा लढा २८ नोव्हेंबरला चौथऱ्यावर प्रवेश केलेल्या पुण्यातील तरुणीने खऱ्या अर्थाने पेटविला. तिने नकळतपणे चौथऱ्यावर प्रवेश केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
सुरक्षारक्षकांची नजर चुकवत काही सेकंदात ही तरुणी चौथऱ्यावर गेली होती. त्यानंतर ती तातडीने निघून गेली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते चित्रित झाले. तरुणीच्या स्पर्शाने चौथरा अपवित्र झाल्याचे सांगत देवस्थानने दुधाने अभिषेक केला. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी जाहीरपणे महिलांच्या प्रवेशासाठी लढा सुरू केला. चौथरा प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला तीन वेळा शिंगणापुरात गेल्या होत्या. मात्र, त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मंदिरात स्त्री-पुरुष असा भेद करता येणार नाही, असा निकाल दिला. मात्र, त्यानंतरही शिंगणापूर देवस्थान चौथरा प्रवेश देण्यास तयार नव्हते. आम्ही पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी केली आहे, असे देवस्थान सांगत होते. त्यामुळे पुरुष भाविकांच्याही श्रद्धेवर गदा आली. त्यामुळे ग्रामस्थांमुळे देवस्थानचाही नाइलाज झाला. श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ म्हणून पाचारण केले होते. मात्र, त्यांना तोडगा काढता आला नाही. शिंगणापूरच्या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर व अन्य देवस्थानांत काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे.