पाचपुतेंच्या राजकारणाला प्रवरेची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:55+5:302021-08-12T04:24:55+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीत साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते व बाळासाहेब नाहाटा यांनी खासदार डॉ. सुजय ...

Revival of Pravara to the politics of Pachpute | पाचपुतेंच्या राजकारणाला प्रवरेची संजीवनी

पाचपुतेंच्या राजकारणाला प्रवरेची संजीवनी

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीत साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते व बाळासाहेब नाहाटा यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांची रणनीती वापरली आणि उपसभापतीचा हारलेला डाव जिंकला. प्रवरेच्या रणनीतीमुळे पाचपुतेंच्या राजकारणाला संजीवनी मिळाली अन् दोन्ही काँग्रेसला हादरा बसला. मात्र, दुखावलेले दोन्ही काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाहाटा यांना भविष्यात जोरदार घेरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

श्रीगोंदा पंचायत समिती उपसभापती निवडणुकीच्या रणधुमाळीत नानासाहेब ससाणे हे अतुल लोखंडे यांच्या गळाला लागले. भाजपकडे ४ सदस्य राहिले. त्यावर साजन पाचपुते यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाळासाहेब नाहाटा यांनी डाव टाकला.

साजन पाचपुते यांनी डॉ. सुजय विखे यांचे अस्त्र वापरले. सुजय विखे यांनी अतुल लोखंडे यांच्या गोटात असलेले सिद्धेश्वर देशमुख व जिजाबापू शिंदे हे आपले दोन प्यादे अलगद काढून घेतले आणि शेवटच्या दिवशी निवडणूक फिरली.

गेल्या निवडणुकीत लोखंडे यांनी निस्वार्थपणे रजनी देशमुख यांना उपसभापती करण्यासाठी भूमिका बजावली. मात्र देशमुख, शिंदे यांनी टोपी फिरवली. ही टोपी कशासाठी फिरवली यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे.

मनीषा नाहाटा यांचा आढळगाव गणात पराभव करणाऱ्या मनीषा कोठारे यांना उपसभापती करण्यासाठी बाळासाहेब नाहाटा यांनी तळी उचलली. यामधून राजकारणात कोणी कुणाचा ना मित्र, ना शत्रू हे पाहावयास मिळाले.

श्रीगोंद्यातील भाजपा गेल्या काही दिवसांपासून सैरभैर झाली आहे. त्यावर दोन्ही काँग्रेस नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली होती; पण उपसभापती निवडणुकीने भाजपाला संजीवनी मिळाली आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्या साथीने तालुक्याच्या राजकारणात साजन पाचपुते यांची एन्ट्री झाली आहे. पंचायत समितीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते आगामी काळात बाळासाहेब नाहाटा यांना जोरदारपणे घेरणार आहेत, याचे स्पष्ट संकेत या निवडणुकीने दिले आहेत.

Web Title: Revival of Pravara to the politics of Pachpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.