महसूल प्रशासन कोमात, रेतीवाले जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:55+5:302021-02-15T04:19:55+5:30
शेवगाव : पर्यावरण मूल्यांकन समितीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव झाले नाहीत. तोच दुसरीकडे गोदावरी नदीसह ...

महसूल प्रशासन कोमात, रेतीवाले जोमात
शेवगाव : पर्यावरण मूल्यांकन समितीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव झाले नाहीत. तोच दुसरीकडे गोदावरी नदीसह विविध नदी-नाल्यांतून रेतीचा अवैध उपसा जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहे. त्यामुळे रेती तस्करांचे चांगभले होत आहे.
मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणच्या नदीपात्रांत दर्जेदार वाळूचा संचय झाला आहे. या दर्जेदार वाळूवर रेती तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. मुंगी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळूची बेकायदा वाहतूक केली जाते. मात्र त्यावर प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या वाळू उपसा होत आहे. हीच अवैध वाळू मोठ्या वाहनांद्वारे वाहून नेली जात आहे. मात्र या वाहतुकीला लगाम घालण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे रेती तस्करांनी वाळूचा उपसा करण्यासाठी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यातून रेती तस्कर गब्बर होत आहेत. प्रशासनातर्फे रेतीची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नदीपात्रातील दर्जेदार रेती दिवसेंदिवस कमी होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कामात महसूल प्रशासन व्यस्त असल्याने रेती तस्करांनी हीच संधी साधली आहे. रेती तस्कर शासनाचा महसूलसुद्धा बुडवित आहे. त्यामुळे शासनाची रॉयल्टी बुडत आहे.
-----
नद्यांची पाणीपातळी घटताच रेती चोरी..
मुंगी, हातगाव, बोधेगाव, सोनविहीर, लाखमापुरी, आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, अमरापूर, ढोरजळगाव आदी गावांतील नदीकाठी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. गोदावरी, नाणी, नंदनी, ढोरा आदी नद्यांची पाणीपातळीने तळ गाठला असून, मोठ्या प्रमाणावर रेती चोरी सुरू आहे. -----
गरजूंना मिळेना रेती..
रेतीला सोन्याचा भाव
कोरोनामुळे बांधकाम ठप्प पडले होते. अनलॉक प्रक्रियेनंतर काही प्रमाणात बांधकाम सुरू झाले. मात्र गरजूंना रेती मिळत नाही. तस्कर चढ्या दराने रेतीची विक्री करतात. सध्या रेतीला सोन्याचा भाव आला आहे. दर वाढल्याने विविध योजनांचे घरकुल लाभार्थी मात्र हवालदिल झाले आहेत. त्यांना सोन्याच्या दरातील रेती खरेदी करणे अवघड झाले.
---
‘तो’ कर्मचारी चर्चेत..
तत्कालीन तहसीलदार विनोद भांबरे यांच्या काळात कार्यालयातील विविध बाबींमध्ये ढवळाढवळ करणारा कर्मचारी सध्या वाळू घाटांवर रेती तस्करांच्या भेटी घेताना ठिकठिकाणी दिसून येत आहे. या गाठी-भेटीमागे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची नागरिकांत चर्चा रंगली आहे.