घोडेगाव पाटबंधारे वसाहतीचे होणार पुनर्जीवन : उपअभियंत्यांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:59 IST2018-07-21T15:58:40+5:302018-07-21T15:59:06+5:30
मुळा पाटबंधारे विभागाच्या घोडेगावमधील वसाहतीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची उपअभियंता बाळासाहेब भापकर यांनी तत्काळ दखल घेतली.

घोडेगाव पाटबंधारे वसाहतीचे होणार पुनर्जीवन : उपअभियंत्यांकडून दखल
घोडेगाव : मुळा पाटबंधारे विभागाच्या घोडेगावमधील वसाहतीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची उपअभियंता बाळासाहेब भापकर यांनी तत्काळ दखल घेतली. त्यानुसार या वसाहतीला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. या वसाहतीच्या दुरूस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यातून या वसाहतीचे पुनर्जीवन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाटबंधारे वसाहतमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतीमधील खोल्या राहण्यास योग्य आहेत की नाही?,कोणत्या इमारती,खोल्यांची पडझड झाली आहे. कोणत्या राहण्यायोग्य आहेत, पण दुरूस्ती गरजेची आहे, पाणी योजना, सांडपाणी, रस्ते, संरक्षक भिंत, वीज, पथदिवे याबाबत पाहणी करून भापकर यांनी माहिती घेतली. ‘लोकमत’ने बुधवार १८ जुलैच्या अंकात ‘घोडेगाव पाटबंधारे वसाहत मरणासन्न’ या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला. येथील मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बाळासाहेब भापकर यांनी शाखाधिकारी प्रकाश अकोलकर यांच्यासह तांत्रिक सहायकांना बरोबर घेऊन वसाहतीची पाहणी केली.
वसाहतीमध्ये पूर्वी राहणारे १९ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवेत असलेले फक्त १२ कर्मचारी या वसाहतीत राहत असल्याचे भापकर यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. निवृत्त कर्मचाºयांकडे घरभाड्यापोटी पाटबंधारे विभागाची लाखो रूपयांची थकबाकी थकलेली आहे. हे घरभाडे मिळत नसल्याने सरकारला या वसाहतीमधून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कर्मचारी वसाहतीच्या देखभाले, दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत.
‘लोकमत’ने मुळा पाटबंधारे उपविभागाच्या घोडेगावमधील वसाहतीच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पंकज लांबाते यांनी वसाहतीच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव शाखाधिकाºयांसमोर मांडला होता. पण त्यांनी यास प्रतिसाद दिला नसल्याचे लांबाते यांन सांगितले. वसाहत लवकरच राहण्यायोग्य व्हावी व कर्मचारी समवेत अधिकाºयांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहिल्यास समस्या सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.
वसाहतीमध्ये राहणा-या सेवेतील कर्मचा-यांना योग्य त्या मूलभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही लवकरच अहमदनगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रस्ताव सादर करणार आहे. याबाबत कार्यवाही करण्यासाठी घोडेगावच्या शाखाधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
-बाळासाहेब भापकर, उपअभियंता, मुळा पाटबंधारे विभाग.