महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST2021-08-22T04:24:52+5:302021-08-22T04:24:52+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल ...

महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल केल्यानंतर बंद असलेली परिवहन मंडळाची बससेवा साधारण दोन महिन्यांपूर्वी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचवणारी लालपरी आता रस्त्यांवर धावू लागली आहे. लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
संगमनेर आगारातून पुणे, औरगांबाद, मालेगाव, मुंबई, चाळीसगाव, बारामती, जालना, गोंदवले, अहमदनगर, नाशिक या लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच कोपरगाव, अकोले, साकूर येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. इतरही आगारांच्या गाड्या संगमनेरात येतात. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येत आहेत.
-------------
संगमनेरात ३६ बसेसचे कोटिंग पूर्ण
अहमदनगर जिल्ह्यातील ४०० एसटी बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होणार आहे. संगमनेर आगारातील ५३ बसेसला कोटिंग करण्यात येणार असून आतापर्यंत जवळजवळ ३६ बसेसचे कोंटिग पूर्ण झाले आहे. कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे टळणार आहे. असे संगमनेर आगाराचे प्रमुख नीलेश करंजकर यांनी सांगितले.
---------
बसेसच्या फेऱ्या फेऱ्यांची संख्या
संगमनेर-पुणे ७
संगमनेर-औरंगाबाद ५
संगमनेर-मालेगाव २
संगमनेर-मुंबई ३
संगमनेर-चाळीसगाव १
संगमनेर-बारामती १
संगमनेर-जालना १
संगमनेर-गोंदवले १
संगमनेर-अहमदनगर ६
संगमनेर-नाशिक ४
----------------------------
सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती
अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांमुळे अनेकांची जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालयांमधील असलेली कामे रखडली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती दिली जाते आहे. तसेच संगमनेरातून बड्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे.
___
संगमनेर आगारातून बसेसच्या दररोज ११२ फेऱ्या होतात. त्यात लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. बसने प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. प्रवाशांनी प्रवास करताना तोंडाला मास्क लावाला, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
नीलेश करंजकर, आगारप्रमख, संगमनेर
----------------
star 1070star 1070