नगर तालुका कोरोनामुक्त करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:54+5:302021-05-19T04:20:54+5:30
प्रयत्न सुरू असून मंगळवारी तालुका प्रशासनाच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांना निमंत्रित करून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगर तालुक्यातील सर्व ...

नगर तालुका कोरोनामुक्त करण्याचा संकल्प
प्रयत्न सुरू असून मंगळवारी तालुका प्रशासनाच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांना निमंत्रित करून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य ग्रामस्तरीय समितीतील तलाठी, ग्रामसेवक यांच्या सोबतीने पद्मश्री पवार यांनी तालुका कोरोनामुक्तीचा संकल्प केला.
नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे काही छोटी छोटी गावे कोरोनामुक्तीकडे झेपावत आहेत. आता संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पवार यांचे मार्गदर्शन घेत तालुका प्रशासन कोरोनाच्या विरोधात मैदानात उतरले आहे. पवार यांच्यासह तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांच्यासह गावपातळीवर काम करणाऱ्याची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यात पवार यांनी सांगितले की, प्रत्येक गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गावातील सरपंच व इतर पदाधिकारी यांनी एकत्रित येत ग्रामस्तरीय समिती शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने प्रयत्न करून कोरोनावर मात करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून संशयास्पद लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची चाचणी करण्यात यावी. आवश्यकतेनुसार रुग्णांस पुढील उपचारासाठी कोविड सेंटर येथे दाखल करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण घरी न राहता विलगीकरण कक्ष किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होईल याची समितीने खात्री करावी. अहमदनगर तालुक्यातील गावांचा शहराशी अत्यंत जवळून संपर्क येत असल्याने प्रत्येक गावामध्ये दुग्ध व्यावसायिक, भाजीपाला, फळे विक्रेते, बाहेरून येणारे मजूर, शहरात नोकरी करणारे अशा प्रकारे नागरिकांचा गट करून प्रत्येक गटनिहाय वेगळे नियोजन करावे. विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या रुग्णांचे दिवसातून दोन वेळा तापमान व ऑक्सिजन तपासणी करावी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील उपचार घ्यावेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी लसीकरणाबाबत सूचना दिल्या. प्रत्येक गावात मतदार यादींचा आधार घेऊन वयाचे उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात येऊन लसीकरणासाठी प्राप्त लसीची संख्येनुसार सदर यादी वापरण्यात यावी व यात समाविष्ट असलेल्या नागरिकांनाच लस देण्यात यावी. लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये. ग्रामस्तरीय समितीने व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन कोरोनाबाबत उपाययोजना कराव्यात अशा सूचना तहसीलदार पाटील यांनी दिल्या. हिवरेबाजार, भोयरे खुर्द, रुईछत्तिसी, चिचोंडी पाटील आदी गावांनी कोरोनाला यशस्वीपणे नियंत्रणात आणलेले असून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनानुसार इतर गावांनी सुद्धा कोरोनावर मात करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या बैठकीस गटविकास अधिकारी घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी मांडगे यांनी देखील मार्गदर्शन केले.
----------
कोरोना बिलांच्या तपासणीसाठी तालुक्यात लेखापरीक्षकांच्या पथकांची नियुक्ती
नगर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नगर तालुक्यातील ग्रामीण भागात स्थित असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये आकारण्यात येणाऱ्या अवाजवी बिलाबाबत नागरिकांना आता तालुका प्रशासनाकडे तक्रार करता येईल. तसेच तालुका प्रशासनाचे वतीने लेखाधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत हॉस्पिटलला दैनंदिन भेट देऊन कोरोना बिलाबाबत ऑडिट केले जात आहे. याकामी एकूण ६ लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे.
कोविड हॉस्पिटलमधील बिलाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास लेखा परीक्षकांकडे तक्रार करावी. कोविड रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी संबंधित ऑडिटरशी संपर्क करून बिल तपासण्याची मागणी करता येईल. जर रुग्णांची अथवा नातेवाइकांची बिलाबाबत तक्रार असल्यास ऑडिटरकडून बिल तपासल्याशिवाय रुग्णांंनी अथवा नातेवाइकांनी बिल अदा करू नये. तसेच यापूर्वी रुग्णांनी अदा केलेल्या बिलाबाबत देखील तक्रार करता येणार आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयाने आकारलेली अवाजवी बिले अथवा शंकास्पद बिले असल्यास ऑडिटरकडून तपासणी झाल्याशिवाय नागरिकांनी भरू नये, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
----------
नगर तालुक्याने आतापर्यंत आपल्या गावात हगणदारीमुक्त, तंटामुक्त अशा अनेक चळवळी राबवल्या. आता आपले गाव कोरोनामुक्त करण्याची चळवळ सर्वांनी एकत्रित येऊन राबवावी. प्रशासन गावकऱ्यांसोबत आहे.
- पद्मश्री पोपटराव पवार