काष्टीत उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: November 7, 2016 00:51 IST2016-11-07T00:15:39+5:302016-11-07T00:51:29+5:30
काष्टी : घोड व भीमा नद्यांच्या पवित्र संगमावर असलेला काष्टी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला झाला़ या गटात साखर व वाळू सम्राटांचा दरारा आहे़

काष्टीत उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला
काष्टी : घोड व भीमा नद्यांच्या पवित्र संगमावर असलेला काष्टी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला झाला़ या गटात साखर व वाळू सम्राटांचा दरारा आहे़ या गटात उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे़ त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते, कोण दुसऱ्या गटात जाऊन उमेदवारी मिळवतो, यावर तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत़
काष्टी जि़ प़ गटावर नेहमीच माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र २००६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचपुते यांचे खंद्दे समर्थक माजी सभापती अरूणराव पाचपुते यांना विखे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब गिरमकर यांनी शिवाजीराव नागवडे यांच्या राजकीय कृपाशीर्वादाने १६४ मतांनी पराभवाची धूळ चारली होती़ २०११ च्या जि़ प़ निवडणुकीत प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी बाळासाहेब गिरमकर यांच्या पत्नीचा सुमारे १ हजार ७०० मतांनी पराभव करून जि़ प़ मध्ये एन्ट्री केली आणि विकास कामांची झलक दाखविली़ काष्टी गट हा सर्वसाधारण प्रवगार्साठी खुला झाला आहे़ मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने या गटात पुन्हा दिग्गज महिलांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे़ या गटात भाजपकडून जि़प़ सदस्या प्रतिभा पाचपुते, साजन पाचपुते, सुवर्णा पाचपुते, प्रताप भगवानराव पाचपुते, लक्ष्मण नलगे तर काँग्रेसकडून बाळासाहेब गिरमकर, अरूणराव पाचपुते, अनिल पाचपुते, लताबाई पाचपुते, धनसिंग भोयटे यांच्या नावाची चर्चा आहे़
माजी सभापती अरूणराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ त्यामुळे नागवडे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे़ मात्र हा गट माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा गड आहे़ त्यामुळे फुटलेल्या सुभेदारांचा कस अटळ आहे़
मागील जि़प़ निवडणुकीत बाळासाहेब गिरमकर यांच्या पत्नीस काष्टी वगळता सर्व गावांमध्ये आघाडी मिळाली होती़ मात्र काष्टीकरांनी गिरमकर यांचे स्वप्न धुळीस मिळवले़ गिरमकर यांनी मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली़ मागील निवडणुकीचा अनुभव जमेला ठेवून नागवडे गट व्यूहरचना आखणार असल्याची चिन्हे आहेत़ पाचपुते गटाकडून प्रतिभा पाचपुते यांचे नाव सध्या आघाडीवर आहे़ मात्र तरूण मतदारांची वाढलेली संख्या विचारात घेऊन या गटात युवा कार्ड वापरले जाऊ शकते़ काष्टी पं़ स़ गण हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे़ त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या घटली आहे़ लिंपणगाव पं़स़ गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपकडून काष्टीचे पोपटराव माने यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत़ काँग्रेसकडून तीन नावे पुढे आली आहे़