केवळ दोन हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचेच पुनर्गठण
By Admin | Updated: June 7, 2016 23:35 IST2016-06-07T23:32:16+5:302016-06-07T23:35:02+5:30
अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले

केवळ दोन हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचेच पुनर्गठण
अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले असून, खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना नवीन १ हजार कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित ३६ हजार शेतकऱ्यांचे अद्यापही पुनर्गठण न झाल्याने बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१५-१६ च्या पीक कर्जाचे पुनर्गठण करून, शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला़ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा सहकारी बँकांना दिले आहेत़
जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार२०१५- २०१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना २०२ कोटीच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी गत ३१ मे पर्यंत २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटीच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांचे १९२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ खरीप व रब्बी पीक वाया गेल्याने शेतकरी हे कर्ज परत करू शकले नाहीत़ त्यामुळे कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी बँकांकडून मात्र शेतकऱ्यांना सहकार्य केले जात नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यास शेतकरी नवीन कर्जास पात्र ठरणार आहेत़
खरीप पिकासाठी चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यातील सर्व बँकांना ३ हजार ८०० कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यापैकी एक हजार कोटीच्या पीक कर्जाचे वाटप जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात आले आहे़ उर्वरित २ हजार ८०० कोटीचे कर्ज जून अखेरपर्यंत करण्यात येणार आहे़ पण, थकीत कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी तळाला असल्याने नवीन कर्ज वाटप होणार कसे, असाही प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)
पुनर्गठण म्हणजे काय?
जून महिना उजाडला आहे़ जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांपैकी अवघ्या २ हजार २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे़ खरीप पीक तोंडावर आले असून, शेतकऱ्यांना सध्या पैशांची गरज आहे़ पुनर्गठण आताच झाले तर त्यांना मागील कर्जाची थकबाकी कायम ठेऊन नवीन कर्ज मिळेल. त्यामुळे उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मध्यंतरी झालेल्या बैठकीत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत़
जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे २०२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ त्यापैकी २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकऱ्यांचे जून अखेरीस पुनर्गठण करण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी बँकांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही़ बँका सकारात्मक आहेत़ पण शेतकरी कर्जाचे पुनर्गठण न करता नवे- जुने करत असल्याचे निदर्शनास आले आहे़
-आऱ एम़ दायमा,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.