मोठे दगड तातडीने काढा ; दरडीच्या दहशतीपासून वाचवा
By Admin | Updated: August 3, 2014 01:10 IST2014-08-03T00:13:58+5:302014-08-03T01:10:21+5:30
पारनेर : ‘आम्ही चिश्ती बाबांच्या कृपेने पूर्वी अनेकदा वाचलो, परंतु आता आपत्ती येण्याआधीच शासनाने काळजी घ्यावी

मोठे दगड तातडीने काढा ; दरडीच्या दहशतीपासून वाचवा
पारनेर : ‘आम्ही चिश्ती बाबांच्या कृपेने पूर्वी अनेकदा वाचलो, परंतु आता आपत्ती येण्याआधीच शासनाने काळजी घ्यावी व डोंगरावरील मोठे दगड व दरडी त्वरीत हटवाव्यात व आमच्या लोकांना दरडीच्या दहशतीपासून वाचवा’ अशी कैफियत पारनेर तालुक्यातील दरोडी ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडली. आता या विषयावर येत्या मंगळवारी ग्रामस्थ व अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे.
पारनेर तालुक्यातील अळकुटीपासून चार ते पाच कि़ मी.अंतरावरील दरोडी गावामध्ये सुमारे तीस ते चाळीस कुटुंब डोंगराच्या कुशीत रहात असून त्यांना डोंगरावरील दरडी व मोठ्या दगडांचा धोका आहे. त्यामुळे दरोडी गावावर दरडीची टांगती तलवार असून येथील रहिवाशांचा जीव नेहमी टांगणीला असल्याचे वास्तव वृत्त ‘लोकमत’ मध्ये (२ आॅगस्ट) प्रसिध्द होताच पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसेच ‘लोकमत’ ने पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटनेनंतर दरोडी येथील गावाची व्यथा जागरूकपणे मांडून हा विषय प्रशासन व लोकांपर्यंत पोहोचवल्याने सर्व थरातून या वृत्ताचे कौतूक करण्यात आले. दरोडी येथे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले महंमद चिश्ती बाबांचा दर्गा प्रसिध्द आहे. राज्यातील अनेकांनी या वृत्तामुळे आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली.
(तालुका प्रतिनिधी)
दहशतीखाली किती दिवस राहणार ?
आम्ही डोंगराच्या दहशतीखाली किती दिवस राहणार? असे म्हणत डोंगराच्या कुशीत राहणारे अहमद शेख, नबाव शेख, गुलाब शेख, नुरमहंमद शेख, शहाबान शेख यांनी आपण कसे जीव मुठीत धरून राहतो याचा पाढाच प्रांताधिकाऱ्यांसमोर वाचला. तर ८० वर्षांची वृध्दा शरूबाई शेख या एकट्या रहात असून त्यांना मोठा धोका असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी सरपंच कैलास कड, उपसरपंच लक्ष्मण कड, वन अधिकारी अनंत कोकाटे व एस.एस.साळवे आदी हजर होते.
गंभीर दखल
‘लोकमत’ ने दरोडीची व्यथा मांडल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शुक्रवारी दुपारी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी दरोडी येथील धोकादायक डोंगर व मोठ्या दगडांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा केली.
अधिकाऱ्यांची दांडी
प्रांताधिकारी संतोष भोर यांनी पारनेरचे बांधकाम विभागाचे उपअभियंता सोनवणे, पारनेर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना निरोप देऊनही त्यांनी दरोडी येथे येण्यास टाळले. यामुळे या प्रकरणाचे गांंभीर्य नसलेल्यांना नोटिसा पाठविण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले.