फळबागधारकांना दिलासा
By Admin | Updated: March 10, 2016 23:13 IST2016-03-10T23:05:22+5:302016-03-10T23:13:29+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या बागायती व फळबागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप मदतीचा ३६ कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनास गुरुवारी प्राप्त झाला आहे

फळबागधारकांना दिलासा
अहमदनगर: जिल्ह्यातील खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या बागायती व फळबागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप मदतीचा ३६ कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनास गुरुवारी प्राप्त झाला आहे. ही मदत तहसीलदारांमार्फत थेट फळधारक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़
दुष्काळाचा खरिपाच्या ५८१ गावांना फटका बसला आहे़ शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. नगर जिल्ह्यासाठी १६७ कोटी मंजूर झाले़ त्यापैकी पहिला ९३ कोटींचा हप्ता प्राप्त झाला़ मात्र निधी वाटपाबाबत संभ्रम निर्माण झाला होता़
निधी वाटपासंदर्भात सरकारचे तीन वेगवेगळे आदेश आहेत़ कोणत्या आदेशानुसार वाटप करायचे असा पेच निर्माण झाला़ अखेर मदत वाटपावर तोडगा निघाला़ पहिला हप्ता कोरडवाहू तर दुसऱ्या टप्प्यात बागायती व फळबागधारकांना आर्थिक मदत देण्याचे ठरले़ दुसरा ३६ कोटींचा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ ही मदत तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे़ तहसीलदारांकडून ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे़
बागायती व फळबागांचे दुष्काळाने मोठे नुकसान झाले़ या क्षेत्राला मदत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ तसेच पिकांचे जीपीएस प्रणालीव्दारे छायाचित्र काढण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे माहिती मिळविताना तलाठ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ ही माहिती मिळवण्यास विलंब झाला असून, त्यामुळे निधी वाटपात गोंधळ होण्याची शक्यता आहे़ शेतकऱ्यांची यादीच तयार नसेल तर निधीचे वाटप कसा करायचे असाही प्रश्न आहे़