चारा, पाण्यासाठी नियम शिथिल करा

By Admin | Updated: April 22, 2016 00:17 IST2016-04-22T00:05:10+5:302016-04-22T00:17:41+5:30

अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ पुढील दोन महिने कठीण जाणार असून, प्रशासनाने जनावरांना चारा व पाण्याच्या पाण्यासाठी नियमावर बोट न ठेवता लवचिक धोरण ठेवावे,

Relax the fodder, water rules | चारा, पाण्यासाठी नियम शिथिल करा

चारा, पाण्यासाठी नियम शिथिल करा

अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ पुढील दोन महिने कठीण जाणार असून, प्रशासनाने जनावरांना चारा व पाण्याच्या पाण्यासाठी नियमावर बोट न ठेवता लवचिक धोरण ठेवावे, असे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी टंचाई आढावा बैठकीत दिले़
महसूलमंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात टंचाई आढावा बैठक पार पडली़ खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे,भाऊसाहेब कांबळे, मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते़ जिल्ह्यातील वस्तुस्थितीची महिती घेऊन खडसे यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले़ बैठकीच्या सुरुवातीलाच टँकर व छावण्यांसाठीचे नियम जाचक असल्याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी खडसे यांचे लक्ष वेधले. मात्र खडसे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते़ ते म्हणाले, छावण्यांचा मागील अनुभव वाईट आहे़ सरकारच्या निर्णयानुसारच प्रशासन काम करत आहे. त्याचबरोबर प्रशासनाला खात्री करून आवश्यक त्याठिकाणी तातडीने टँकर सुरू करा. फार नियमावर बोट ठेवू नका़ गावात जावून खात्री करा आणि टँकर तत्काळ सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले़ छावण्यांसाठी ५०० जनावरांची अट आहे, मात्र आवश्यक तिथे ही अट जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल करावी़ तसे अधिकार त्यांना दिले आहेत़ चाऱ्याअभावी जनावरांची रवानगी कत्तलखान्यात होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले़ दोन महिने राहिले आहेत़ दोन महिन्यांत तक्रारी येणार नाहीत, याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी़ लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वेगाने कामे करा, परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
कृषी पंपाचे १०० टक्के वीज बिल माफ
टंचाईग्रस्त गावांतील कृषीपंपाची ३३ टक्के वीज बिल माफीची घोषणा सरकारने केली आहे़ मात्र त्यात वाढ करून शेतीपंपाचे १०० टक्के वीजबिल माफ करणार असून, येत्या जुलैपर्यंत एकाही शेतीपंपाची वीज खंडित न करण्याचे आदेश खडसे यांनी यावेळी दिले़
तालुक्याला दोन जेसीबी
जिल्ह्यात १४ तालुके आहेत़ प्रत्येक तालुक्यात दोन जेसीबी व पोकलॅन मशिन देण्यात येणार आहे़ तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे़ मशिन्सचे व्याज सरकार भरणार असल्याचे खडसे यांनी यावेळी जाहीर केले़
आमदारांनी पाडला समस्यांचा पाऊस
दुष्काळी सवलतींचा लाभ द्या
शासनाने ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती जाहीर केल्या़ मात्र श्रीरामपूर तालुक्यातील गावांचा यात समावेश नाही़ त्यामुळे सरकारी सवलतींपासून श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत़ त्यांना सवलती मिळाव्यात़
-आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूर
फळबागांना अनुदान द्या
श्रीगोंदा तालुक्यातील फळबागा पाण्याअभावी वाया गेल्या असून, फळबागांसाठी अनुदान देण्यात यावे़ तसेच कुकडी प्रकल्पातून श्रीगोंद्यातील अधिकाधिक तळे भरावेत.
-आमदार राहुल जगताप, श्रीगोंदा
जनावरांना पाणी द्या
जनावरांना वेगळे पाणी देण्याची गरज आहे़ मात्र ते दिले जात नाही़ छावण्यांसाठी जाचक अटी आहेत़ त्यामुळे सरकारच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, छावण्यांच्या अटी शिथिल करून आवश्यक तिथे तातडीने छावण्या सुरू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत़
-आमदार विजय औटी, पारनेर
छावण्या सुरू करा
शेवगाव- पाथर्डी तालुक्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे़ मात्र या दोन्ही तालुक्यात एकही छावणी सुरू झाली नाही़ प्रशासनाकडून यासंदर्भात कार्यवाही व्हावी़ आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात़ जलभूमि अभियानासाठी जलयुक्तच्या गावांची असलेली अटही रद्द करावी.
-आमदार मोनिका राजळे, शेवगाव-पाथर्डी
वाड्यावस्त्यांवर पाणी द्या
वीज बिल न भरल्यामुळे कृषीपंपाची खंडित करण्यात येत असून, ते करू नयेत़ त्याचबरोबर टँकरच्या अटी शिथिल कराव्यात़ कारण गावांत राहणाऱ्यांची संख्या कमी आहे़ वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करावी़ वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे़ त्यामुळे पाण्याची खरी गरज तेथे आहे़
-आमदार शिवाजीराव कर्डिले, राहुरी
आयुक्तांच्या जाचातून
मुक्त करा
चारा व टँकरच्या अटींबाबत कितीही सांगितले तरी त्याची अंमलबजवणी होत नाही़ प्रशासन विभागीय आयुक्तांचेच ऐकते़ विभागीय आयुक्तांचा नगर जिल्ह्याला त्रास आहे, त्यातून जिल्ह्याला मुक्त करा़
-आमदार बाळासाहेब मुरकुटे, नेवासा

Web Title: Relax the fodder, water rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.