विधवा-विधुरांच्या जुळणार रेशीमगाठी!

By Admin | Updated: January 12, 2015 13:44 IST2015-01-12T13:38:44+5:302015-01-12T13:44:35+5:30

प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो.

Relatives of widows and widowers! | विधवा-विधुरांच्या जुळणार रेशीमगाठी!

विधवा-विधुरांच्या जुळणार रेशीमगाठी!

पद्मशाली समाजाचा पुढाकार : एकटेपणाचे जीवन पुन्हा आनंदाने बहरणार

अहमदनगर -  प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो. जोडीदाराच्या कायमच्या जाण्यामुळे एकटेपणाचे जीवन त्यांच्या वाट्याला येते. अशा दुर्लक्षितांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलविण्यासाठी पद्मशाली समाजाने पुढाकार घेतला आहे. विधवा-विधुरांच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
पद्मशाली समाजाचे महाराष्ट्रात बहुतांश शहरांमध्ये वास्तव्य आहे. राज्यात १६ ते १७ लाख एवढी पद्मशाली समाजाची लोकसंख्या आहे. मिळेल तिथे काम करणे,हा त्यांचा स्वभावगुण! कापड व्यवसाय, विडी काम यामध्ये पद्मशाली समाजाचे मोठे योगदान आहे. शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज बराच मागे आहे. इतर समाजाप्रमाणेच वधु-वरांचे मेळावे घेण्याचे काम या समाजातील कार्यकर्ते जोमाने करीत आहेत. पहिल्यांदा ज्यांचे लग्न होते, त्यांच्यासाठी सर्वच काम करतात. ज्यांना अकाली वैधव्य, विधुरत्व आले आहे, ते एका कोपर्‍यात राहतात. पुन्हा लग्न करायचे की नाही, असा विषय काढण्याची अनेकांना चोरी वाटते. पुरोगामीत्वाचे कितीही डांगोरे पिटले तरी पुनर्विवाह हा विषय अजूनही तसा दुर्लक्षितच आहे. पिंपरी-चिंचवड येथील प्रा. सदानंद बोगम यांनी नुकतीच पुनर्विवाह संस्था स्थापन करून पद्मशाली समाजातील दुर्लक्षितांच्या रेशीमगाठी जुळविण्याचे काम हाती घेतले आहे. बोगम यांनी पद्मशाली समाजाची नगरला बैठक घेऊन पुनर्विवाह मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा मेळावा ८ फेब्रुवारी २0१५ रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. 
या मेळाव्याबाबत महाराष्ट्र पद्मशाली वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अंबादास चिट्टय़ाल म्हणाले, कोणाचा जावई गेला, कोणाची लेक गेली, कोणाचा अपघात झाला, तर कोणाचा घटस्फोट झाला, कोणी कोणाला टाकून दिले, अशा वार्ता कानावर रोजच आदळत होत्या. अशा घटनांमुळे संबंधित कुटुंबाची वाताहत झालेली बघून मन व्यथित झाले. ज्यांचा आधार गेला, असे किती लोक आहेत, याचा शोध घेतला. आधी काहीच सांगण्यास नकार देणारे आता स्वत: पुढे येऊन विवाहाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून दुसर्‍या विवाहासाठी अनेकांना तयार केले. त्यानंतर इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने मेळावा आयोजित करण्याचा विचार पुढे आला. 

 पिंपरी चिंचवडला होणारा पुनर्विवाह इच्छुकांचा पहिला मेळावा आहे. हा मेळावा फक्त पद्मशाली समाजातील लोकांसाठीच आहे. यापुढे अशा मेळाव्यांचे स्वरुप व्यापकपणे हाती घेतले जाणार आहे. सर्वच समाजातील विधवा-विदुरांची लग्ने जुळविण्यासाठी कार्य हाती घेण्यात येणार आहे. असा मेळावा पुढील सहा महिन्यात नगरला करण्याचे नियोजन आहे.
- अंबादास चिट्टय़ाल, ज्येष्ठ कार्यकर्ते, अहमदनगर राज्यामध्येही असा इच्छुकांचा शोध सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुनर्विवाह मेळाव्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगरमध्ये पद्मशाली समाजाची लोकसंख्या ५0 हजार एवढी आहे. सर्वात जास्त पुनर्विवाह इच्छुकांची नोंदणी (९५ जणांची) नगरमध्ये झाली. त्यामध्ये ६0 पुरुष आणि ३५ स्त्रिया आहेत. विधुर-विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांचा शोध घेणे, त्यांच्यात जागृती करून त्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणणे यासाठी प्रयत्न आहेत.
- प्रा. सदानंद बोगम, पुनर्विवाह संस्था, पिंपरी-चिंचवड सुदाम देशमुख■ 

Web Title: Relatives of widows and widowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.