मृत रुग्णाच्या नातेवाईकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:39+5:302021-04-19T04:18:39+5:30
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तोडफोड ...

मृत रुग्णाच्या नातेवाईकाने
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तोडफोड केली. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
उपचार घेत असलेल्या रुग्णाला वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेने जिल्हा रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
नगर तालुक्यातील एका कोरोना संसर्ग रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. यावेळी एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
..............
बेडसाठी नातेवाईकांची वणवण भटकंती
नगर शहरासह जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना नगर शहरात उपचारासाठी आणले जात आहे. त्यांना मात्र रुग्णालयात बेड मिळत नाहीत. बेड मिळाले तरी ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अनेकांवर वणवण भटकंतीची वेळ आली आहे. उपचार मिळतील या अपेक्षेने काही रुग्ण हॉस्पिटलच्या बाहेर बसून राहतात, असे विदारक चित्र सध्या नगर शहरात दिसत आहे.
..........