प्रेम प्रकरणातून वाद झाल्यानंतर बदनामीच्या भीतीतून रेखा जरे यांचे हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:41+5:302021-06-09T04:25:41+5:30
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुख्य आरोपी बाळ ...

प्रेम प्रकरणातून वाद झाल्यानंतर बदनामीच्या भीतीतून रेखा जरे यांचे हत्याकांड
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे (रा. नगर) याच्यासह जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी, व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात ४५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून हत्या करणे तर उर्वरित सहा जणांविरोधात फरार आरोपीला मदत करणे असा दोष ठेवण्यात आला आहे. बोठे याने ३० नोव्हेंबर २०२० रोजी सुपारी देऊन जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे हत्या घडवून आणली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोघा मारेकऱ्यांसह एकूण पाच आरोपींना अटक केली होती. या आरोपींविरोधात २६ फेब्रुवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर बोठे मात्र फरार झाला होता. १३ मार्च रोजी पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथून अटक केली. यावेळी त्याला हैदराबाद येथे मदत करणाऱ्या पाच जणांनाही पोलिसांनी अटक केली होती.
२६ साक्षीदारांसह भक्कम पुरावे
पुरवणी दोषारोपपत्रात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत, तर जरे यांची हत्या झाली तेव्हा कारमध्ये त्यांची आई, मुलगा व एक महिला प्रशासकीय अधिकारी हे प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीचे सीसीटीव्ही फुटेज, बोठे याचे कॉल डिटेल्स, जरे यांच्या घरातून मिळालेले पत्र, तसेच आधीच्या दोषारोपपत्रात नोंदविलेले तब्बल ९० जणांचे जबाब अशा भक्कम पुराव्यांची जंत्री पोलिसांनी दोषारोपपत्रात सादर केली आहे.
-----------------------
बोठे याने असा रचला कट
बोठे याने सागर भिंगारदिवे याला हाताशी धरून जरे यांच्या हत्येचा कट रचला. २४ नोव्हेंबर करंजी घाटात जरे यांच्या कारचा अपघात घडवून घातपात करण्याचे ठरले, मात्र आरोपींचा हा डाव फसला. त्यानंतर ३० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. बोठे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी दिली. भिंगारदिवे याने हे काम आदित्य सुधाकर चोळके याला दिले. चोळके याने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या मारेकऱ्यांना सुपारी दिली. ३० नोव्हेंबर रोजी या दोघांनी जरे यांची हत्या केली. ३० नोव्हेंबर रोजी बोठे हा जरे यांच्या संपर्कात राहून आरोपींना त्यांचे लोकेशन देत होता. या हत्याकांडात ऋषीकेश वसंत पवार याचाही सहभाग होता.