पदोन्नतीला नकारघंटा
By Admin | Updated: August 3, 2014 01:09 IST2014-08-02T23:57:11+5:302014-08-03T01:09:59+5:30
अहमदनगर : अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ३९६ पद्वीधर शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे.

पदोन्नतीला नकारघंटा
अहमदनगर : अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ३९६ पद्वीधर शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. यावेळी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या १ हजार ४०० पैकी बहुतांशी शिक्षकांनी नकार दिला आहे. पदोन्नतीच्या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेचा परिसर गर्दीने फुलला होता.
शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पदोन्नतीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी प्रक्रियाच्या नियोजनात स्वत:हून लक्ष घालत दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात हजर झाले. प्राथमिक शिक्षक विभागाने तयार केलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादीत आंतरजिल्हा शिक्षकांची नगरऐवजी पूर्वीच्या जिल्ह्याची सेवाज्येष्ठता यादी ग्राह्य धरण्यात आली होती.
मात्र, याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच नवाल यांनी आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची नगरची सेवा ज्येष्ठतेसाठी धरावी, ज्येष्ठता लपविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देताच अनेकांनी पदोन्नती नाकारली.
त्यानंतर पदोन्नतीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पदवीधर शिक्षकांचे पदोन्नतीच्या मराठी माध्यमातून ६३४ आणि उर्दू माध्यमातून ६३ जागा होत्या.
पहिल्याच दिवशी यापैकी ३९६ भरल्या गेल्या आहेत. पहिल्या दिवशी शिक्षण विभागाने दोन सत्रात ७०० शिक्षकांचे लॉट जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलविले होते.
त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त असणाऱ्या जागांचा तपशील दाखविण्यात आला. त्यावर शिक्षकांनी त्यांच्या पसंतीनुसार रिक्त जागांवर पदोन्नती देण्यात आली.
वास्तवात मिळणारी पदोन्नती यात २५० रुपये प्रती महिना आर्थिक तोटा असल्याने, तसेच गैरसोईचे ठिकाण यामुळे एक हजारहून अधिक पद्वीधरांनी पदोन्नती नाकारली. जिल्हा परिषदेत दिवसभर शिक्षकांची मोठी गर्दी होती. पदोन्नतीसाठी सभागृहात जाणाऱ्या शिक्षकांसोबत अनेक शिक्षक हौस म्हणून सभागृहात उपस्थित होते. यामुळे विनाकारण गर्दी झालेली दिसत होती.
आज रविवारी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु राहणार असून, उर्वरीत ४०३ जागांवर पदवीधरांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी गोविंद यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पदोन्नतीचे योग्य नियोजन केले होते. शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी रमजान पठाण, एस. बी. कराड, कक्ष अधिकारी शिवाजी भिटे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले.
पदोन्नतीची प्रक्रिया व्यवस्थित पारपडते की नाही, याची खातर जमा करण्यासाठी सर्व शिक्षक नेते सभागृहात दिवसभर ठाणमांडून होते. यात संजय कळमकर, रावसाहेब रोहकले, राजू शिंदे, अनिल आंधळे, संजय धमाणे, नवनाथ तोडमल, गोकुळ कळमकर, शिवाजी अनाप यांच्यासह अन्य शिक्षकांचा समावेश होता.