शिर्डीत विखेंचा विक्रमी झंझावात
By Admin | Updated: October 20, 2014 10:21 IST2014-10-20T10:21:28+5:302014-10-20T10:21:28+5:30
राज्यात काँग्रेसचे अनेक गड उदध्वस्त होत असताना शिर्डीत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळपास पंचाहत्तर हजार मतांची विक्रमी आघाडी घेत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अभय शेळके यांना पराभूत केले.

शिर्डीत विखेंचा विक्रमी झंझावात
शिर्डी : राज्यात काँग्रेसचे अनेक गड उदध्वस्त होत असताना शिर्डीत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळपास पंचाहत्तर हजार मतांची विक्रमी आघाडी घेत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अभय शेळके यांना पराभूत केले. यामुळे विखे सलग सहाव्यांदा आमदार होत आहेत. धक्कादायक म्हणजे भाजपाचे राजेंद्र गोंदकर व राष्ट्रवादीचे शेखर बोर्हाडे यांच्यासह उर्वरित सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली.
विश्लेषण
विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे यांची राहाता शहरातून मिरवणूक काढण्यात आली. विरोधक निष्प्रभ
नवखे असलेले भाजपाचे राजेंद्र गोंदकर यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने ते सर्व गावांत पोहोचू शकले नाहीत. गणेश कारखान्यासाठी त्यांनी केलेले कामही त्यांना वाचवू शकले नाही. शेखर बोर्हाडेंना तर राष्ट्रवादीचीच साथ मिळाली नाही. आश्वी मंडलात शेजारच्या तालुक्यातून शिवसेनेला आलेली रसदही विखेंची घौडदौड रोखू शकली नाही. मतांची टक्केवारी
राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस)-६३.१0, अभय शेळके (शिवसेना)- २४.३१, राजेंद्र गोंदकर (भाजपा)- ८.९७, शेखर बोर्हाडे (राष्ट्रवादी)- १.६५. याशिवाय 0.६१ टक्के मतदानांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचे (नोटा) मत व्यक्त केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे गणेश, प्रवरा व आश्वी सर्कल असे तीन भाग पडतात. यात गणेश परिसरात ४१, प्रवरा परिसरात ३६ तर आश्वी सर्कल मध्ये २३ टक्के मते आहेत. विखे यांना एकूण मतांच्या ६३ टक्के मते पडली. यात विखेंच्या पारड्यात गणेश परिसराने २२, प्रवरा परिसराने २१, तर आश्वी परिसराने २0 टक्के मतदान केले. याशिवाय शिर्डीत दोन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार असूनही विखेंना ६५६ मतांची, तर राहात्यातून तब्बल ४,३३८ मतांची आघाडी मिळाली. विकासकामांवर शिक्कामोर्तब
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. नऊ वाजता पहिल्या फेरीचा, तर साडेबारा वाजता अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे यांनी जाहीर केला. पहिल्या फेरीपासूनच आघाडीचे सातत्य कायम राखत विखे यांनी ७४ हजार ६६२ मतांची आघाडी घेत शिवसेनेचे अभय शेळके यांचा निर्णायक पराभव केला. सेना-भाजपाची एकत्रित बेरीजही मतांच्या आघाडीचा आकडा गाठू शकली नाही. पहिल्या फेरीत कल लक्षात आल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मोजणी कक्षाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहतूक वळवण्यात आली असली तरी प्रचंड गर्दीने वाहतुकीची कोंडी झाली. निकालानंतर राहात्यातील बिरोबा मंदिरापर्यंत राधाकृष्ण विखे यांची वाहनातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अण्णासाहेब म्हस्के, राजेंद्र विखे, विजयाचे प्रमुख शिलेदार सुजय विखे, नितीन कोते आदींची वाहनावर उपस्थिती होती.यानंतर शिर्डीतही खंडोबा मंदिरापासुन पुन्हा विजयी मिरवणूक काढून साईबाबांचे दर्शन घेण्यात आले. यावेळी ढोल-ताशे, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत तरुणांनी एकच जल्लोष केला. राधाकृष्ण विखे यांच्या आजच्या नेत्रदीपक विजयामागे त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांची प्रचंड मेहनत आहे. त्यांनी विखे कुटुंबाचा मधल्या काळात सामान्य नागरिकांशी तुटलेला संवादाचा धागा पुन्हा जोडत खेडोपाडी तरुणांचे संघटन उभे केले. विखे यांनीही अगदी सामान्य पातळीवर येत दिलेली विकासाची ग्वाही मतदारांना भावली. शिर्डीत महाविद्यालय सुरू करण्याचा मुद्दा विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतला. गणेश कारखाना सुरू करून विखेंनी गणेश परिसरातील नाराजी कमी केली. यामुळे दोन स्थानिक उमेदवार असतानाही विखेंना शिर्डीतून आघाडी मिळाली. अभय शेळके यांनी गेली दीड वर्षे प्रचंड मेहनतीने मतदारसंघात संपर्क केला होता. मात्र युती तुटल्याने ते एकाकी पडले. त्यातच कमलाकर कोतेंसारखे आघाडीचे फलंदाज तंबूतच राहिले. शिर्डी : राज्यात काँग्रेसचे अनेक गड उदध्वस्त होत असताना शिर्डीत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळपास पंचाहत्तर हजार मतांची विक्रमी आघाडी घेत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अभय शेळके यांना पराभूत केले. यामुळे विखे सलग सहाव्यांदा आमदार होत आहेत. धक्कादायक म्हणजे भाजपाचे राजेंद्र गोंदकर व राष्ट्रवादीचे शेखर बोर्हाडे यांच्यासह उर्वरित सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली.
विश्लेषण - प्रमोद आहेर