जिल्ह्यात कोविड मृत्यूची नोंद अद्याप अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:34+5:302021-06-24T04:15:34+5:30
रुग्णालये आणि राज्य सरकार यांच्याकडून कोविडसंबंधी मृत्यूची चुकीची नोंद केल्यास कोविडविरुद्धचा लढा कमजोर होईल. त्यामुळे मृत्यूचे नेमके चित्र व ...

जिल्ह्यात कोविड मृत्यूची नोंद अद्याप अपूर्ण
रुग्णालये आणि राज्य सरकार यांच्याकडून कोविडसंबंधी मृत्यूची चुकीची नोंद केल्यास कोविडविरुद्धचा लढा कमजोर होईल. त्यामुळे मृत्यूचे नेमके चित्र व कारणीमीमांसा करण्यासाठी सरकारने सर्वत्र लेखापरीक्षण हाती घेतले आहे. कोविडची दुसरी लाट आता ओसरल्याने आरोग्य विभागाला कामातून काहीशी उसंत मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यात नोंदविल्या जाणाऱ्या निरीक्षणातून कोविडच्या पुढील संभाव्य लाटेची तयारी करण्यास मदत होणार होईल, अशी अपेक्षा आरोग्य विभाग बाळगून आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मृत्यूच्या आकडेवारीपेक्षा त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी हे लेखापरीक्षण हाती घेतले जाते. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत. विलगीकरणात न गेल्यानेही मोठे नुकसान झाले. घरगुती उपचारांमध्ये आजाराचा महत्त्वाचा वेळ वाया गेला. श्वास घेण्यास त्रास जाणवल्यानंतर रुग्णांनी उपचारासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आजार बळावला होता.
त्याचबरोबर अद्यापही काही खासगी रुग्णालयांनी मृत्यूच्या आकड्यांची माहिती सादर केलेली नाही. महापालिकेचीही तीच स्थिती आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येमध्ये बदल होईल. मात्र ही संख्या कमी होणार नसून निश्चितच वाढ नोंदविली जाईल, अशी माहिती डॉ. पोखरणा यांनी दिली.
---------
दुसऱ्या लाटेत तरुणांना फटका
कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये ३० ते ४५ हा वयोगट बचावला होता. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही. दुसऱ्या लाटेमध्ये मात्र या वयोगटाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले.
----------
एखादी व्यक्ती हृदयविकारामुळे मरण पावली असेल, मात्र तिला कोविडचा संसर्ग झालेला असेल, तर हा संसर्ग हृदयविकाराच्या धक्क्याला कारणीभूत मानला जाणार आहे. त्यामुळे असे मृत्यू हे कोविड मृत्यू म्हणूनच नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
-------------