नुकताच पूर्ण झालेला राज्यमार्ग काही दिवसांत उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:23+5:302021-06-09T04:26:23+5:30
शेवगाव : पाथर्डी ते अमरापूरदरम्यानच्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. शेवगाव तालुक्यातील अमरापूर, तर पाथर्डी ...

नुकताच पूर्ण झालेला राज्यमार्ग काही दिवसांत उखडला
शेवगाव : पाथर्डी ते अमरापूरदरम्यानच्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. शेवगाव तालुक्यातील अमरापूर, तर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ अवघ्या काही दिवसांत रस्ता उखडल्याने या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना वाहनांना अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने साकारण्यात आलेल्या बारामती ते अमरापूर राज्यमार्ग क्र. ५४ च्या हरकती असलेल्या काही ठिकाणचा अपवाद वगळता, अन्य रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आगामी काळात अमरापूर ते औरंगाबाददरम्यानच्या रस्त्याचे काम होऊन, बारामती व औरंगाबादला जोडणारा राज्यमार्ग भिगवण, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, पैठण आदी शहरांच्या विकासात भर घालणारा आहे. पाथर्डी ते शेवगाव तालुक्यांतील अमरापूर गावापर्यंत राज्यमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. चकाचक दिसणाऱ्या या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. या मार्गावर गाव तिथे लक्षवेधी बसथांबेदेखील उभारण्यात आले आहेत, तसेच ठिकठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या या मार्गावर शेवगाव तालुक्यातील अमरापूर ते काळेवाडी, तर पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी ते खेर्डा फाटादरम्यान काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. काही ठिकाणी डागडुजी करण्यात आल्याचे दिसत आहे. चकाचक दिसणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचा वेग वाढला आहे. अचानक समोर दिसणारा खड्डा चुकवताना वाहनांना अपघात होण्याचा धोका वाढला असून, सदर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित होत आहेत.