नगराध्यक्षांविरुध्द श्रीगोंद्यात बंड
By Admin | Updated: March 19, 2016 00:09 IST2016-03-19T00:05:26+5:302016-03-19T00:09:42+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांनी सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी वेळोवेळी विरोधकांशी हातमिळवणी केली.

नगराध्यक्षांविरुध्द श्रीगोंद्यात बंड
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांनी सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी वेळोवेळी विरोधकांशी हातमिळवणी केली. महिला नगराध्यक्षा असताना दिरच कारभार करीत आहे. या मनमानी कारभाराला धडा शिकविण्यासाठी आपण भाजपा प्रणित शहर विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरसेवक सुनील वाळके यांनी दिली.
नगरसेवक वाळके यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना पत्र दिले. वाळके माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नजीकचे नातेवाईक आहेत. त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी गोटात खळबळ उडाली आहे .
आम्ही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशानुसार छाया गोरे यांना एक वर्षासाठी नगराध्यक्ष पद दिले. एक वर्षानंतर नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला. परिणामी उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, अर्चना गोरे विरोधात गेले. पाचपुते यांनी नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची अनेकदा विनंती केली, मात्र नगराध्यक्षांनी नेत्याचाही शब्द पाळला नाही. आपण यापुढे बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, मात्र नगराध्यक्षा गोरे यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बबनराव पाचपुते यांनी बाबासाहेब भोस यांची मर्जी सांभाळण्यासाठी नगराध्यक्षा छाया गोरे यांना बळ दिले. आता नगरसेवक वाळके यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची पुन्हा कोंडी झाली आहे.
उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, नगरसेविका अर्चना गोरे यांचे पती राजू गोरे, सुनील वाळके यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. वाळके यांच्या बंडाला या मैत्रीची किनार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .
(तालुका प्रतिनिधी)