दक्षिण भारतासह राजधानीत पोहोचला नगरच्या संत्र्यांचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:06+5:302021-02-05T06:35:06+5:30

केडगाव : मागील वर्षीच्या दुष्काळाचे आर्थिक चटके सहन करत, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा मोठ्या कष्टाने जगविल्या. एकीकडे संत्रा ...

Reached the capital along with South India | दक्षिण भारतासह राजधानीत पोहोचला नगरच्या संत्र्यांचा गोडवा

दक्षिण भारतासह राजधानीत पोहोचला नगरच्या संत्र्यांचा गोडवा

केडगाव : मागील वर्षीच्या दुष्काळाचे आर्थिक चटके सहन करत, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा मोठ्या कष्टाने जगविल्या. एकीकडे संत्रा लागवडीचे क्षेत्र वाढत असताना, स्थानिक पातळीवर संत्रा खरेदी केंद्र नसल्याने व्यापारीच भाव ठरवतात. यात शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. मात्र, असे असले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत असून, नगरच्या संत्राचा गोडवा थेट दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडूसह दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आता तर व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मालखरेदी करीत आहेत.

तालुक्यात ३ हजार ९०० एकर क्षेत्रावर संत्राबागांचे उत्पादन घेतले जाते. खडकी, पिंपळगाव उज्जेनी, खंडाळा, वाळकी, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव माळवी या परिसरात संत्रा फळाचे जास्त उत्पादन घेतले जाते. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान, यामुळे या भागात संत्रा पिकांच्या बागा सध्या चांगल्याच बहरल्या आहेत. मृग नक्षत्रात संत्रा फळासाठी बहार घेतला जातो. जून महिन्यात बहार घेतल्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात फळे तोडणीस येतात. सध्या फळे तोडणीचा हंगाम सुरू झाल्याने संत्रा बागेत काढणीची लगबग सुरू आहे. फळांचा बहार गळू नये, तसेच फळगळ वाढू नये, यासाठी औषध फवारणी केली जाते. लागवड व इतर खर्च कमी येतो. मागील काही वर्षांत सततच्या दुष्काळामुळे फळांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प उत्पन्नावरच समाधान मानावे लागले, तरीही विकतचे पाणी देऊन शेतकऱ्यांनी संत्रा बागा जगविल्या. शेतकरी मुंबई मार्केटमध्ये माल विक्रीस नेतात. आता मात्र, व्यापारीच शेतकऱ्यांच्या बागेत येऊन माल खरेदी करीत आहेत. काही व्यापारी ठोक पद्धतीने शेतकऱ्यांचा मालखरेदी करीत आहेत. मालाचा भाव व्यापारीच ठरवत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. कधी-कधी यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होते. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल व्यापरी थेट केरळ, तामिळनाडू, कोलकत्ता, दिल्ली या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत. यामुळे नगरच्या संत्राचा गोडवा दक्षिण भारतासोबत राजधानीतही पोहोचला आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना प्रतिकिलो २० ते ५० रुपयांचा भाव मिळत आहे.

----

संत्रा विक्रीसाठी नगर बाजार समितीने विक्री केंद्र सुरू करावे, अशी आमची मागणी आहे. हे केंद्र सुरू झाले, तर शेतकऱ्यांची होणारी लूट बंद होईल, तसेच शेतकऱ्यांकडून आडत घेणे राज्य सरकारने बंद केले, तरीही नवी मुंबईच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाते.

- केतन निकम,

शेतकरी, खडकी

----

आमच्याकडे अमरावती येथील व्यापारी माल खरेदीसाठी आले आहेत. आम्हाला यंदा प्रती किलो ३० ते ३५ रुपये भाव मिळाला आहे. मागील वर्षी हाच भाव १४ रुपये प्रति किलो होता. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी पाणी असल्याने उत्पादन चांगले व भावही चांगला मिळाला आहे.

-कमालभाई शेख,

शेतकरी, पिंपळगाव उज्जेनी

फोटो ३० नगर संत्रा

Web Title: Reached the capital along with South India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.