जातीत घेण्यासाठी मागितली खंडणी
By Admin | Updated: March 24, 2017 19:23 IST2017-03-24T19:23:22+5:302017-03-24T19:23:22+5:30
जातीत घेण्यासाठी जातपंचायतीच्या सदस्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली आहे़

जातीत घेण्यासाठी मागितली खंडणी
>अहमदनगर : जातीबाहेर टाकलेल्या कुटुंबाला परत जातीत घेण्यासाठी जातपंचायतीच्या सदस्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली आहे़ गरीब कुटंबाला दोन लाखांची खंडणी मागणाºया बारा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील पाईपलाईन रोडवरील निर्मलनगर परिसरात राहणारे संजय मच्छिंद्र धनगर यांनी जातपंचायत रद्द व्हावी, यासाठी तक्रार अर्ज दिला होता़ जातपंचायतीविरोधात तक्रार दिल्याने पंचायतीतील सदस्यांनी धनगर यांना पत्नी व मुलासह जातीबाहेर काढल्याचे जाहीर केले़ तसेच परत जातीत यायचे असेल, तर दोन लाख रुपयांची मागणी केली़ हे पैसे न दिल्यास समाजातील कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मज्जाव करून शिवीगाळ व दमदाटी केली़ याप्रकरणी संजय धनगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारुती सीताराम शिंदे, बाबू शंकर धनगर, मुसला शंकर शिंदे, बापू यादव शिंदे, मच्छिंद्र शंकर धनगर, अंबू बापू शिंदे, बापू तात्या शिंदे, नारायण अंबू धनगर, गोरख नाथा धनगर, तायगा बापू धनगर, संतोष मच्छिंद्र धनगर, राजू ऊर्फ तात्या मारुती धनगर (सर्व़ रा़ वैदूवाडी) यांच्यावर कलम ३८५, १२०,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास एस़एस़ माळशिखरे हे करत आहेत़
जातपंचायती व त्यांच्यामार्फत घेतलेले जाणारे निर्णय घटनाबाह्य आहेत़ असे निर्णय देणाºया अनेक पंचांविरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ मात्र वारंवार जातपंचायतीकडून होणाºया अन्यायाच्या घटना समोर येत आहेत़ अशा जातपंचायतीवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे मत समाजातून व्यक्त होत आहे़