वाद मिटविण्यासाठी खंडणी : अकरा जणांविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल
By Admin | Updated: February 18, 2017 21:43 IST2017-02-18T21:43:49+5:302017-02-18T21:43:49+5:30
अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा तिरमली समाजाची जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली.

वाद मिटविण्यासाठी खंडणी : अकरा जणांविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल
शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा तिरमली समाजाची जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली. दोन मुलींना सासरी नांदवत नसल्याने यासंदर्भात जातपंचायतीत वाद मिटविण्यासाठी दोन लाखांची मागणी केल्याच्या फिर्यादीवरुन न्यायालयाच्या आदेशाने शिर्डी पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की, शिर्डीजवळील सावळीविहीर गावातील तिरमली समाजातील एका व्यक्तीने आपल्या दोन मुलींचे लग्न नेवासा तालुक्यातील चांदा गावातील एकाच कुटुंबातील दोन भावांशी करून दिले होते. मात्र घरात किरकोळ वाद झाल्याने या दोन्ही सख्या बहिणींना सासरच्या लोकांनी घरा बाहेर हाकलून दिले होते़ या दोन्ही बहिणी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या माहेरी राहत आहेत़
दरम्यान या मुलींना सासरचे लोक नांदवत नसल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या घरी समाजाची जात पंचायत भरविली होती़ यावेळी पंचांनी हे वाद मिटविण्यासाठी या मुलींच्या वडिलांकडे दोन लाखांची मागणी केली़ यावर मुलीच्या वडिलांनी आपल्याकडून दोन लाखांची खंडणी मागण्यात येत असल्याची व जाती बाहेर काढण्याची धमकी देण्यात येत असल्याची खासगी फिर्याद राहाता न्यायालयात दाखल केली होती़
आरोपींची नावे
न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी जात पंचायत व सासर कडील अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे़ यात बाळासाहेब गंगाधर शिंदे, अहिल्याबाई गंगाधर शिंदे, काशिनाथ गंगाधर शिंदे, रामा गंगाधर शिंदे, हनुमंत गंगाधर शिंदे (सर्व चांदा, ता. नेवासे), रामा साहेबराव फुलमाळी (ओझर गणपती, नारायणगाव), सुभाष हनुमंता फुलमाळी (शिंगणापूर, ता. नेवासे), गंगाधर तुकाराम फुलमाळी (भेंडा, ता. नेवासे), गंगा गंगाधर गुंडाळे (दैठण, ता. श्रीगोंदे), तात्याबा शिवराम फुलमाळी (ढोरजळगाव, गंगापूर, औरंगाबाद), उत्तम फुलमाळी (जेऊर, ता. नेवासे) आदींचा समावेश आहे़ अशाच स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी श्रीगोंदा, संगमनेर येथेही दाखल झाल्याचे सांगण्यात येते़(शहर प्रतिनिधी)