उखाण्याने रंगला हळदी-कुंकू कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:53+5:302021-02-05T06:33:53+5:30
अभिनेत्री कोमलताई सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास धनश्री सुजय विखे, सभापती सुनीता गौकुळ दौंड, अलका ...

उखाण्याने रंगला हळदी-कुंकू कार्यक्रम
अभिनेत्री कोमलताई सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास धनश्री सुजय विखे, सभापती सुनीता गौकुळ दौंड, अलका शिवाजीराव कर्डिले आदींसह विविध गावांच्या महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी हजेरी लावली. पुढाऱ्यांच्या कारभारणींनी प्रसंगी उखाणे घेतले. त्यामुळे आचार्य आनंदऋषीजींच्या मायभूमीतील हा सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ सार्वत्रिक आनंद देणारा ठरला.
‘पानात पान मसाले पान... पाथर्डी तालुक्यातले म्हणतेत शिवाजीच छान...’ अशी अलकाताई कर्डिले यांनी उखाण्याची रंगतदार सुरूवात केली. ‘इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून, सुजयरावांचं नाव घेते विखे पाटलांची सून...’ असा उखाणा धनश्री विखे यांनी घेतला. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. सभापती दौंड यांनी माझा उखाणा चोरलाय... अशी मिश्कील टिपण्णीही विखे यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्या वैशाली जराड, अंबिका दानवे, वैशाली गरुड, शारदा आव्हाड, सोनाली फुलमाळी, प्रयागाबाई आव्हाड, रुपाली भिंगारदिवे, अनिता आटकर, धनश्री गंडाळ, मोनाली खलाटे, सुवर्णा मुळे, ऐश्वर्या शिंदे, अर्चना कुसळकर, सुनीता आंधळे आदींचे ग्रामीण ढंगातील उखाणे टाळ्या घेणारे ठरले. आरोग्यसेविका, महिला पोलीस, अंगणवाडी सेविका आदी विविध कोरोना योद्धा ठरलेल्या महिलांना प्रसंगी सन्मानित करण्यात आले. धनश्री विखे यांनी महिलांना संबोधित केले. प्रादेशिक योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी प्रास्ताविक केले. अनिता आटकर यांनी आभार मानले.