रणरागिणींचा रुद्रावतार
By Admin | Updated: June 23, 2014 00:08 IST2014-06-22T23:32:31+5:302014-06-23T00:08:56+5:30
दारुअड्डा उद्ध्वस्त : पारनेर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर
रणरागिणींचा रुद्रावतार
पारनेर : दारू विक्रेत्यांकडून महिलांना येणाऱ्या धमक्या, विक्रेत्यांची दहशत व त्यांच्याविरुध्द पारनेर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने वाढलेली मद्यपींची संख्या या त्रासाला कंटाळून तालुक्यातील पिंपळगावरोठा गावातील महिलांनी शनिवारी रौद्ररूप धारण करून गावातील दारू अड्डे उद्ध्वस्त केले.
तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे तीन दारू दुकानांमधून अनेक वर्षांपासून दारू व्रिकी चालू आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव करूनही गावात दारूविक्री सुरूच राहिल्याने काही महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर दारू विक्रेत्यांवर कारवाईऐवजी महिलांवरच दारू विक्रेत्यांनी धमकीचे सत्र सुरू केले.
महिलांना शिवीगाळ
दारू विक्रेत्यांनी शुक्रवारी महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. तसेच रोज अनेक घरांमध्ये पुरूषांचे दारू सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंबांमध्ये कलह वाढले. या सर्व घटनांना कंटाळलेल्या विमल पावडे, रोहिणी पावडे, कांताबाई पवार यांच्यासह गावातील इतर महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत गाठले आणि दारूबंदीची मागणी केली. ग्रामपंचायतीने ‘आम्ही पोलिसांना वारंवार विनंती केली, परंतु त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचे सांगितले. ग्रामपंचायत व पोलीस काहीच करीत नसल्याने संतप्त महिलांनी आपला मोर्चा थेट दारू दुकानाकडेच वळविला. दुकानदारांना याची माहिती मिळताच त्यांनी दुकानाला कुलूप लावून धूम ठोकली. परंतु कोणत्याही परिस्थितीत दारू दुकान उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला आणि दुकानाचे कुलूप तोडून तेथील दारूसाठा ग्रामपंचायतीजवळ आणून उद्ध्वस्त केला.
(तालुका प्रतिनिधी)
आयुष्याची राखरांगोळी करणार का ?
आमच्या अनेक कुटुंबात सध्या दारुमुळे भांडणे होतात. याचा महिलांना त्रास होतो. दारूची दुकाने सुरू ठेवून आमच्या आयुष्याची राखरांगोळी करायची काय? असा सवाल संतप्त महिलांनी केला.
पिंपळगाव रोठा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूअड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पारनेर पोलिसांनी एका दारू विक्रेत्यावर कारवाई केली आहे. भविष्यातही तेथील दारू विक्रेत्यांवर कारवाई करू.
शरद जांभळे, पोलीस निरीक्षक, पारनेर
कैफियत मांडणार
पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रोज बाहेरील भाविक येतात. जर याच गावात दारूविक्री होत असेल आणि पोलीस कारवाईस टाळाटाळ करीत असतील तर ते निंदनीय आहे, अशी खंत या महिलांनी व्यक्त केली. या संदर्भात आपण जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून कैफियत मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.