चार तासातच राजूरची पाणी योजना बंद
By Admin | Updated: July 1, 2016 00:30 IST2016-06-30T22:53:24+5:302016-07-01T00:30:58+5:30
राजूर : नव्याने दुरुस्त करण्यात आलेली जुन्या विहिरीवरील येथील पाणी पुरवठा योजना अवघ्या चार तासातच बंद पडल्यामुळे राजूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट अद्यापही कायम आहे.

चार तासातच राजूरची पाणी योजना बंद
राजूर : नव्याने दुरुस्त करण्यात आलेली जुन्या विहिरीवरील येथील पाणी पुरवठा योजना अवघ्या चार तासातच बंद पडल्यामुळे राजूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट अद्यापही कायम आहे.
दरम्यान बंद पडलेली पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरू करून गावाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी राजूर विकास आघाडीने गुरुवारी येथील कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
गेल्या दहा दिवसांपासून येथील बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावी यासाठी विकास आघाडीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे कोल्हार घोटी रस्त्यावर सभेत रूपांतर झाले.
या सभेत बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की, युती शासनाच्या काळात १९९५ मध्ये राजूर पाणी पुरवठा योजना मंजूरकरण्यात आली. मात्र ही योजना चालविण्यास स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा अपयश आले. गावाला पाणी पुरविणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असताना सत्ताधारी मात्र शासनाला दोष देण्याचे काम करू नये , असे सांगतानाच पाणी पुरवठा मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटून राजूरचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार असल्याचे ते म्हणाले.
जि.प. सदस्य डॉ. किरण लहामटे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावाला २४ तास पाणी देण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र दहा दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा अद्यापही सुरळीत झाला नाही. ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही डॉ.लहामटे यांनी दिला. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विनय सावंत, माजी उपसरपंच काशिनाथ भडांगे आदींनीही आपल्या मनोगतातून स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले. (वार्ताहर)