राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली!
By Admin | Updated: October 23, 2014 14:46 IST2014-10-23T03:49:21+5:302014-10-23T14:46:57+5:30
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली!
अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़ त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खा़ रामदास आठवले यांनी येथे लगावला.
राज्यात भाजपासोबत जाताना सत्तेत दहा टक्के वाटा मिळावा, अशी बोलणी झाली होती़ मात्र, आठपैकी आमची एकही जागा निवडून आली नाही़ त्यामुळे आता किमान दोन मंत्रिपदे आणि महामंडळात आम्हाला सहभाग मिळावा, अशी मागणी केल्याचे खा़ आठवले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत रिपाइंच्या वाट्याला आठ जागा आल्या होत्या मात्र, अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले़ युतीच्या घोळात हा विलंब झाला़ या आठ जागा अगदी दोन ते चार हजारांच्या फरकाने हातातून गेल्या़ तरी एकही जागा जिंकता आली नाही, याची सल मनात आहे़ एकही जागा आली नसली तरी रिपाइंची मते ही भाजपासाठी प्रत्येक मतदारसंघात ग्रेसमार्क सारखी ठरली आहेत़ विधानसभेत निळा आणि भगवा फडकावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते़ मात्र, शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांच्या इगोमुळे युती तुटली़ युती टिकावी, यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)