पावसाचा रुसवा कायम
By Admin | Updated: August 12, 2014 23:19 IST2014-08-12T23:11:30+5:302014-08-12T23:19:53+5:30
पारनेर : कमी पावसामुळे पारनेर तालुक्यातील अनेक तलाव अजुनही कोरडे आहेत.

पावसाचा रुसवा कायम
पारनेर : कमी पावसामुळे पारनेर तालुक्यातील अनेक तलाव अजुनही कोरडे आहेत. उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांडओहोळ धरणातही केवळ वीस ते पंचवीस टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यावर पावसाळ्यातही दुष्काळाचे सावट कायम आहे.
तलाव कोरडे
आॅगस्ट महिना अर्धा संपत आला तरी पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा हंगा तलाव, सुपा परिसराला पाणी पुरवठा करणारे तलाव तसेच रायतळे, पिंपळगाव रोठा येथील तलावात थोडाच पाणीसाठा असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या बिकट बनत आहे. पावसाने रूसवा कायम धरल्याने तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांडओहोळ धरणात अवघा ६६ दशलक्ष घनफुट पाण्याचीच आवक झाली आहे. धरणाची एकूण क्षमता ३९९ दशलक्षघनफुट एवढी आहे.
टँकरने पाणी पुरवठा
तालुक्यातील सध्या ५७ गावे २४९ वाड्या, वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे भीषण वास्तव ऐन पावसाळ्यात समोर येत आहे. यामधील अनेक टँकर मांडओहोळ धरणाजवळील विहिरीतूनच भरले जातात. यामुळे धरणात पाणीसाठा येणे आवश्यक आहे. अन्यथा पाण्याचे टँकरही दुसऱ्या तालुक्यातून भरावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
पारनेर शहराजवळील हंगा तलाव, सोबलेवाडी व कुंभारवाडी तलावातही पाण्याची आवक कमीच आहे. त्याचा परिणाम पारनेर शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत असून यामुळे पारनेर ग्रामपंचायतीला सुपा एम.आय.डी.सी.तून पाणी घ्यावे लागते. (तालुका प्रतिनिधी)